A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
साहु कसा वनवास

साहु कसा वनवास, प्रियतमे?
क्षणाक्षणाला आठवतो तव मयुरपंखि सहवास

सांज उतरता क्षितीजावरती
गडद सावल्या मनीं दाटती
जीवनज्योती तू मालवता, उरे काजळी रास

फुले पाहता वेलीवरती
तुझेच भावुक डोळे हसती
भावभराने ओठ टेकिता दंश करी आभास

घरि दारी वा शयनागारी
रूप घुटमळे नागकेशरी
स्पर्शसुखाची स्वप्‍ने विरता, जळे एकला श्वास

भासासंगे श्वास मिटावे
जळते ओले दु:ख विझावे
रेघ धुराची तुज भेटाया, भिडु दे आभाळास
गीत - मधुकर कुलकर्णी
संगीत - गजानन वाटवे
स्वर- गजानन वाटवे
गीत प्रकार - भावगीत