A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सौंदर्याची खाण पाहिली

सौंदर्याची खाण पाहिली, पाहिली आम्ही पहिल्यांदा
नयनांमधला बाण लागला, लागला अम्हां पहिल्यांदा

वाटते परंतु सांगाया ना जुळे
डोळ्यांत आमुच्या भाव नवे आगळे
बोलल्या वाचुनी गुज तुम्हाला कळे
शब्द मधाचे ठिबकू द्यात ना, ठिबकू द्या कानी पहिल्यांदा

हा रंग गोड का गालावरची खळी
पाहता आमुच्या पावन झाल्या कुळी
उपजली उगीचच मनात आशा खुळी
घायाळाची गती समजली, समजली अम्हां पहिल्यांदा

या आधी अम्हां माहीत नव्हती प्रीती
परि आज सुखाचा स्वर्ग लागला हाती
कधी दोन मनांची जुळून येतील नाती
नकळत चेटुक होय अम्हांवर, अम्हांवर असले पहिल्यांदा
आगळा - अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण.
गुज - गुप्‍त गोष्ट, कानगोष्ट.