A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
शालू हिरवा पाच नि

शालू हिरवा पाच नि मरवा वेणि तिपेडी घाला
साजणी बाई येणार साजण माझा!
गोर्‍या भाळी चढवा जाळी नवरत्‍नांची माला
साजणी बाई येणार साजण माझा!

चूलबोळकी इवलीइवली भातुकलीचा खेळ ग
लुटूपुटीच्या संसाराची संपत आली वेळ ग
रेशिमधागे ओढिति मागे व्याकुळ जीव हा झाला

सूर गुंफिते सनई येथे झडे चौघडा दारी
वाजतगाजत मिरवत येईल घोड्यावरुनी स्वारी
मी वरमाला घालिन त्याला मुहूर्त जवळी आला

मंगलवेळी मंगलकाळी डोळा का ग पाणी?
साजण माझा हा पतिराजा मी तर त्याची राणी
अंगावरल्या शेलारीला बांधिन त्याचा शेला
मरवा - सुगंधी पाने असलेली एक वनस्पती.
शेलारी - उंची साडी / शालू.