A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
शिव-शक्तिचा अटीतटीचा

शिव-शक्तिचा, अटीतटीचा खेळ चालला भुवन-पटी
त्रिगुणाचे ते तीनच फासे चराचरांतुनी निनादती

कधी उलटे कधी सुलटे पडती
कधी रडविती कधी हासविती
नरनरदांना कधी फिरविती
कधी मारिती, उद्धरती

पहा पहा हो पडले बारा
छे छे हे तर पडले अकरा
कधी वाकडे तेरा पडुनी
तीनतेरा वाजविती

असंख्य नरदा उगाच भ्रमती
अज्ञानाच्या घरात रमती
परि भक्तीचा पंथ सेविता
अंती मोक्षपदावरती

चंद्र-चंद्रिका अभिन्‍न सुंदर
तसे निरंतर गौरीशंकर
जेथे गौरी तेथे शंकर
एकरूप ते या जगती
चंद्रिका - चांदणे.
नरद - सोंगटी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.