A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
शोधितो राधेला श्रीहरी

शारद पुनवा शांत चांदणे कालिंदीच्या तटी
गोपी जमल्या रास रंगला कदंबतरूतळवटी

दिसेना सखी लाडकी परि
शोधितो राधेला श्रीहरी!

इथे पाहतो तिथे पाहतो
मधेच थबकून उभा राहतो
बासरी मुकीच ओठांवरी
शोधितो राधेला श्रीहरी!

दरवळलेल्या कुंजानिकटी
इथेच ठरल्या होत्या भेटी
कशी ती वेळा टळली तरी
शोधितो राधेला श्रीहरी!

काय वाजले प्रिय ते पाऊल
तो तर वारा तिची न चाहूल
भास हो फसवा वरचेवरी
शोधितो राधेला श्रीहरी!
कुंज - वेलींचा मांडव.
कदंब (कळंब) - वृक्षाचे नाव.
कालिंदी - यमुना नदी. कालिंद पर्वतातून उगम पावलेल्या यमुना नदीस कालिंदी म्हणूनही संबोधण्यात येते.
तळवटी - खाली.