A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
श्रीहरी विदुराघरी पाहुणा

सुवर्णद्वारावतिचा राणा
श्रीहरी विदुराघरी पाहुणा!

मिष्टान्‍ने कोठुन?
आणिला कणिकोंडा रांधुन
सांगे आवर्जुन
भाबडी विदुराची सुगरण
वानी रुचकरपणा
श्रीहरी विदुराघरी पाहुणा!

कवळ मुखी नेतसे
मागुनी पुन्हा पुन्हा घेतसे
तृप्त मनी होतसे
तृप्तिची ढेकर वर देतसे
विसरे जलपाना
श्रीहरी विदुराघरी पाहुणा!

प्रेमळपण आगळे
चाटितो उरलीसुरली दळे
योग्यांना ना मिळे
मूर्त ते परब्रह्म सावळे!
काय लाडकेपणा
श्रीहरी विदुराघरी पाहुणा!
आगळा - अग्रेसर / श्रेष्ठ / जास्त / अधिक / वैशिष्ट्यपूर्ण.
कवळ (कवल) - घास.
द्वारावती - द्वारका.
वानी - मोल.