A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
सूर्य डोईवर जळणारा

सूर्य डोईवर जळणारा, चांदराती झगमगणारा
दिशा दिशा तरी कशा उदास रे गमल्या
तुझ्याविना, सखया तुझ्याविना

पश्चिमवेलीवरती फुलल्या रंगफुलांच्या माला
पौर्णिमेतुनी पहा पसरल्या शीतल मोहक ज्वाला
सार्‍यातुन विरघळताना, आत आत मोहरताना
दिशा दिशा तरी कशा उदास रे गमल्या
तुझ्याविना, सखया तुझ्याविना

भान हरपुनी पाय थबकले एका जागी आता
माझ्या पुढती धावत सुटल्या अदृष्याच्या वाटा
वाटा हिरव्या हसणार्‍या, जरी क्षितिजाशी पळणार्‍या
दिशा दिशा तरी कशा उदास रे गमल्या
तुझ्याविना, सखया तुझ्याविना
गीत - संदीप खरे
संगीत - सलील कुलकर्णी
स्वर- बेला शेंडे
अल्बम - हृदयातले गाणे
गीत प्रकार - भावगीत
अदृष्ट(ष्य) - न पाहिलेले / दैव, प्रारब्ध.