A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
त्या माझिया देशातले

त्या माझिया देशातले पंछी निळे-जांभळे
हे मोकळे आकाश गा वेटाळुनी चालले

घाटातल्या वळणातली कौलार खेडी जुनी
मिरगामधी बरसातीला मल्हार गाती कुणी
पिकलेपणी आंबेवनी स्वर कोकिळेचा गळा
अरुवार त्या कंठातला रानावनाला लळा

केळीतल्या दांडातले पाणी हळू वाहते
साळीतल्या ओंब्यामधे पडसावली हालते
ज्येष्ठातली चवळी नवी ढवळी फुले माळुनी
पिवळ्या-निळ्या पक्षांसवे कानातली बोलणी

ज्वारीतल्या कणसातला रुजला कसा जारवा
मज वेढतो देशातल्या त्या मातीचा गारवा
तो गारवा मजला हवा, आकाश पंखातले
या देशीच्या त्या देशीच्या डोळ्यांत ओथंबले
अरवार (अरुवार, अलवार) - मृदू, नाजूक.
दांडा - पाटाचे पाणी जमिनीत जिरू नये म्हणून जमिनीपासून केलेली उंच बंदिस्त.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  जयश्री शिवराम, रवींद्र साठे