A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उंच उंच माझा झोका

उंच उंच माझा झोका..
झोका बांधला आकाशाला,
झोका चढतां उतरतां
झाला पदर वारा वारा !

झोक्याला देतें वेग
पाय टेकून धरणीला,
लाल मातीच्या परागाचा
रंग चढतो पावलाला !

झोका चढतो पूर्वेवर
जाईजुईंनी सावरीला,
दंवाधुक्याचा शुभ्र साज
अंगावरती चढवीला !

झोका चढतो पश्चिमेला
वेल लालन देते तोल,
मोकळ्या केसांमधे
गुंफी सनया लाल लाल.

झोका चढतो उंच उंच
पाय पोचती मेघांवरती,
इंद्राच्या डोहावरी
लाल पाखरें पाण्या येती !

झोका चढतो उंच उंच
मला थांबतां थांबवेना;
गुंजेएवढें माझें घर
त्याची ओळख आवडेना !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  पद्मजा फेणाणी-जोगळेकर