A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उपवर झाली लेक लाडकी

उपवर झाली लेक लाडकी लग्‍नाला आली
स्वयंवराची तिच्या घोषणा द्रुपदांनी केली

सुवर्णस्तंभावरी बसविली फिरती मत्स्याकृती
तेलामाजी बिंब पाहुनी छेदिल हो कोण ती?
छेदिल त्याला विवाहमाला घालिल पांचाली

रतीहुनी ती अतीव सुंदर सुभगा गुणशालिनी
मऊ रेशमी अलकभार तर ख्यात स्वरूपाहुनी
धनुर्धरांच्या मनिंची आशा आव्हाना टपली

स्वयंवराचा भरला मंडप, गर्दी तरि ती किती !
देशोदेशचे जमले हो ते रणशार्दुल नृपती
भावासंगे तेजस्विनी ती सभागृही आली

हत्तीवरुनी जणू चमकली समूर्त सौदामिनी
सूतपुत्र अन्‌ कर्ण राहिला उभा त्वरे उठुनी
हीन कुळीचा म्हणुन तयाला संधी नच दिधली

इतुके होते तरीही कृष्णा कुणातरी न्याहळी
ब्राह्मणवेषे तोच निरखिला अर्जुन नृपमंडळी
जीवाशिवासम त्या दोघांची दृष्टभेट झाली

त्या नजरेने स्फुरले बाहू वीर सिद्ध झाला
अचुक लावुनी बाण तयाने मत्स्यभेद केला
धनंजयाच्या गळां धन्य ती वरमाळा पडली
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - मा. कृष्णराव
स्वर- लता मंगेशकर
चित्रपट - किचकवध
गीत प्रकार - चित्रगीत
अलक - कुरळे केस / कपाळावरील केसांची बट.
उपवर - लग्‍नास योग्य वयाची.
कृष्णा - द्रौपदी.
धनंजय - अर्जुन.
नृपति - राजा.
शार्दूल - वाघ.
सुभगा - भाग्यशाली स्‍त्री.
सौदामिनी - वीज.