A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
वालीवध ना खलनिर्दालन

मी धर्माचें केलें पालन
वालीवध ना, खलनिर्दालन

अखिल धरा ही भरतशासिता
न्यायनीति तो भरत जाणता
त्या भरताचा मी तर भ्राता
जैसा राजा तसे प्रजाजन

शिष्य, पुत्र वा कनिष्ठ भ्राता
धर्मे येते त्यास पुत्रता
तूं भ्रात्याची हरिली कांता
मनीं गोपुनी हीन प्रलोभन

तूं तर पुतळा मूर्त मदाचा
सुयोग्य तुज हा दंड वधाचा
अंत असा हा विषयांधांचा
मरण पशूचें पारध हो‍उन

दिधलें होतें वचन सुग्रिवा
जीवहि देइन तुझिया जीवा
भावास्तव मी वधिलें भावा
दिल्या वचाचें हें प्रतिपालन

नृपति खेळती वनिं मृगयेतें
लपुनि मारिती तीर पशूतें
दोष कासया त्या क्रीडेतें
शाखामृग तूं क्रूर पशूहुन

अंत्य घडी तुज ठरो मोक्षदा
सांभाळिन मी तुझ्या अंगदा
राज्य तुझें हें, ही किष्किंधा
सुग्रीवाच्या करीं समर्पण
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - केदार
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- १/१२/१९५५
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- सुधीर फडके.
अंगद (तारासुत) - वाली आणि तारा यांचा पुत्र.
कासया - कशासाठी.
किष्किंधा - वाली व सुग्रीव यांचा देश. म्हैसूर व हैद्राबाद यांच्यामध्ये.
खल - अधम, दुष्ट.
गोपणे - लपविणे.
नृपति - राजा.
भ्राता - भाऊ.
मद - उन्माद, कैफ
वाली - एक वानर. सुग्रीवाचा वडील भाऊ. किष्किंधा नरेश. याने सुग्रीव पत्‍नी रुमा हीचे हरण केले होते.
विषयवासना (विषय) - कामवासना.
शाखामृग - माकड.
सुग्रीव - एक वानर. वालीचा भाऊ. यांस वालीने पदच्युत केले होते.

 

Print option will come back soon
  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण