A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
या इथें लक्ष्मणा बांध

या इथें, लक्ष्मणा, बांध कुटी
या मंदाकिनिच्या तटनिकटीं

चित्रकूट हा, हेंच तपोवन
येथ नांदती साधक, मुनिजन
सखे जानकी, करि अवलोकन
ही निसर्गशोभा भुलवि दिठी

पलाश फुलले, बिल्व वांकले
भल्लातक फलभारें लवले
दिसति न यांना मानव शिवले
ना सैल लतांची कुठें मिठी

किती फुलांचे रंग गणावे?
कुणा सुगंधा काय म्हणावें?
मूक रम्यता सहज दुणावें
येतांच कूजनें कर्णपुटीं

कुठें काढिती कोकिल सुस्वर
निळा सूर तो चढवि मयूर
रत्‍नें तोलित निज पंखांवर
संमिश्र नाद तो उंच वटीं

शाखा-शाखांवरी मोहळे
मध त्यांच्यांतिल खालीं निथळे
वन संजीवक अमृत सगळें
ठेविती मक्षिका भरुन घटीं

हां सौमित्रे, सुसज्ज, सावध,
दिसली, लपली क्षणांत पारध
सिद्ध असूं दे सदैव आयुध
या वनीं श्वापदां नाहिं तुटी

जानकिसाठीं लतिका, कलिका
तुझिया माझ्या भक्ष्य सायकां,
उभय लाभले वनांत एका
पोंचलों येथ ती शुभचि घटी

जमव सत्वरी काष्ठें कणखर
उटज या स्थळीं उभवूं सुंदर
शाखापल्लव अंथरुनी वर
रेखुं या चित्र ये गगनपटीं