A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
येशिल येशिल येशिल राणी

येशिल येशिल येशिल राणी, पहाटे पहाटे येशिल?
तुझिया माझिया प्रेमाची पावती साखरचुंबन देशिल?

ओलेती पहाट शहार्‍याची लाट गळ्यांत रेशमी बाहू
तुझी हनुवटी जरा उचलता नको ना रागाने पाहू
प्राजक्तफुलांचा पाऊस झेलीत मिठीत मिटून जाशिल?

चंद्र मावळेल वाट दाखवेल शुक्राचा टपोरा तारा
कोवळ्या क्षणाचे जपून लक्षण सांगेल कोवळा वारा
भानात नसून गालांत हसून ललाट चुंबन घेशिल?

वाजता पाऊल घेईल चाहूल जाळीत चोरटा पक्षी
कोणाला दिसेना, असू दे असेना, मीलना एखादा साक्षी
धुक्याने दोघांना झाकून टाकता मुक्याने माझी तू होशिल?
गीत - वसंत बापट
संगीत - यशवंत देव
स्वराविष्कार- अरुण दाते
उत्तरा केळकर, रवींद्र साठे
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• स्वर- उत्तरा केळकर, रवीद्र साठे, चित्रपट- पोरींची धमाल बापाची कमाल (१९८७).

चित्रपटात या गाण्याचा वापर करताना, मूळ गाण्यातील दुसर्‍या व तिसर्‍या कडव्यांच्या जागी असलेली दोन कडवी -

धुंद यौवनाचा प्रेम जीवनाचा लाभला सुगंधी झेला
झाले मी बावरी साजणा सावरी नाजुक गुलाबफुला
उन्हात-छायेत प्रेमात-मायेत सदैव संगती नेशील?

अवेळी तांडव कोसळे मांडव भुईला लोटली वेली
मिळाला उदार प्रीतीचा आधार जुईला तरारी आली
आनंद पूरात मंगल सुरांत जन्माचा वसंत होशील?

 

  अरुण दाते
  उत्तरा केळकर, रवींद्र साठे