A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
येऊ कशी तशी मी नांदायला

नेहमीच राया तुमची घाई
नका लावू गठुडं बांधायला
येऊ कशी तशी मी नांदायला हो

सण वर्षाचा आहे दिवाळी
आज र्‍हावू जाऊ उद्या सकाळी
जेवण करते पुरणाची पोळी
भात मी घातलाय रांधायला हो
येऊ कशी तशी मी नांदायला

गाव हाय आपलं बारा कोसं
डोकं तुमचं असं वो कसं?
उन्हतान्हात चालण्याचं त्रास
दिल्यात चपल्या सांधायला हो
येऊ कशी तशी मी नांदायला

बाबा गेले हो परगावा
निरोप त्यांचा घ्यायाला हवा
नाही विचारलं थोरल्या भावा
आई गेली पाणी शेंदायला हो
येऊ कशी तशी मी नांदायला

तुम्हाला सजणा सांगत्ये ऐका
चालावू नका तुमचा हेका
तुम्हीच सांगा हे बरं हाय का
श्रावण लागलाय सुंदायला हो
येऊ कशी तशी मी नांदायला
शेंदणे - दोरी लावून, हाताने, विहिरीतून ओढणे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.