तुकारामबुवांचे अभंग इंद्रायणीच्या डोहात तरले तसेच पठ्ठे बापूराव या तमासगीर 'बुवांच्या' लावण्या लोकगंगेने तारल्या. त्यांनी सर्व प्रकारच्या लावण्या लिहिल्या. उदाहरणार्थ,
आधी गणाला रणी आणला
असा मानवी जीवनातील 'मी-तू'पणाचा चुना करणारा गण, तमाशाच्या कोणत्याही फडात गायिला नाही, असं कधी होत नाही. पठ्ठे बापूरावांच्या गणांनीच ऐंशी टक्के तमाशा फड सुरू होतात. जे जे 'सत्' त्या सत्चा आदिकर्ता हा गणनायकच असतो. त्याच्या स्तवनाने एक उदात्त, पवित्र आणि मंगलमयी, स्फूर्तीदायक वातावरण तयार होते. 'सत्'च्या विविध रंगच्छटा वर्णन करणारे 'गण' पठ्ठे बापूरावांच्या लेखणीतून उतरले आहेत.
पेशवाईच्या काळात राम जोशी, होनाजी बाळा, अनंत फंदी, सगनभाऊ, प्रभाकर, परशराम यांनी आपल्या पोवाडे व लावण्यांनी मराठी वाङ्मय समृद्ध केले. त्यातून 'तमाशा' ही लोककला पुढे आली. पण नंतरच्या काळात तसा समर्थ लोकशाहीर या लोककलेला लाभला नाही. या क्षेत्रात एक अंधारयुगच निर्माण झाले.
असाच काही काळ गेला आणि तमाशा या सर्वसामान्यांच्या लोककलेला नवी झळाळी देणारा एक लोकशाहीर उदयाला आला. त्याने तमाशाला नवचैतन्य दिले. त्याला नावीन्याने नटविले. मराठी मातीचे अस्सल रंग त्यात भरले. आपल्या चतुराईने तमाशा कलेला मोहक रूप दिले. तमाशाला नवा बहर आला. आपल्या हातातल्या डफाने मराठी मनाला टवटवी दिली. वेगळ्या ढंगाच्या कवनांनी मराठी मनाला रिझविले. आणि त्याचबरोबर लोकशिक्षण व लोकप्रबोधनही साधले. असा आपल्या बहारदार कवनांनी मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत बनलेला तो थोर लोकशाहीर म्हणजे, पठ्ठे बापूराव.
ज्याच्या नसानसात एक वीरवती रग सळसळत होती, ज्याने मराठमोळ्या लोककलेच्या उत्थानासाठी जातपात मोडून टाकली, परंपरागत चालत आलेला समाजधर्म झुगारून टाकला, आपल्या कळत्या वयापासून तमाशाचा ध्यास रोमारोमात मुरविला आणि आपल्या विविधरंगी कवनांद्वारे नवा लोकधर्म आचरणात आणला, महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांतील अज्ञ जनांच्या प्रबोधनासाठी सोवळे खुंटीला टांगले, त्या बापूरावाने आपला क्रांतिकारक बाणा व्रतासारखा जपला.
बापूरावांनी तमाशा कलावंत गोळा केले. ब्राह्मण्य झुगारून तमाशाचा फड उभा केला. आधीच त्यांच्या लावण्या तमाशाच्या फडांतून गायल्या जात होत्या. रसिकांना आवडल्या होत्या. रसरशीत कवने ऐकून रसिकांच्या तोंडून उद्गार निघत, 'शाब्बास पठ्ठे.'
बेभान झालेले रसिक शिट्या वाजवीत. फेटे उडवीत. 'पठ्ठे बापूराव' ही पदवी लोकांनीच अंतःस्फूर्तपणे बापूरावांना बहाल केली. बापूरावांचे 'पठ्ठे बापूराव' झाले आणि हेच नाव सर्वत्र दुमदुमत राहिले. पठ्ठे बापूरावांच्या लावण्यांनी लोकांची मने जिंकली. त्यांचा तमाशा गाजू लागला. एक ब्राह्मणाचा पोर तमाशा उभा करतोय हेच नवल होते. त्यामुळेही लोकांमध्ये आकर्षण होते. तरीही लोकांमध्ये कुजबूज होती. गावातील लोकांच्या कपाळाला आठ्या पडत होत्या. घरात नाराजी होती. पण बापूरावांचा दृढनिश्चय होता. हातात डफ घेऊन ते गरजले,
श्रेष्ठवर्ण मी ब्राह्मण असूनी । सोवळं ठेवले घालूनी घडी ।
मशाल धरली हाती तमाशाची | लाज लावली देशोधडी ।
महत्त्वाकांक्षा मनात एवढी । ठेवून बाजूला हजार नडी ।
आपण तरोनी कैक तरावे । भवबंधाच्या पैलथडी ॥
महाराष्ट्रात एकीकडे राजकीय क्षेत्रात लोकमान्य टिळक गाजत होते. दुसरीकडे राजमान्य बालगंधर्व सगळ्यांच्या गळ्यातील ताईत बनले होते, नाट्यक्षेत्रात राम गणेश गडकरी आपल्या नाटकांनी मराठी रंगभूमीला अलौकिक लौकिक मिळवून देत होते. त्याच काळात तमाशा लोककलेचा राजा लोकशाहीर शीघ्रकवी पठ्ठे बापूराव मराठी मनावर अधिराज्य गाजवत होते. राम गणेश गडकरी तसेच बालगंधर्व या कला क्षेत्रातील दोन महनीय व्यक्तींवर भरभरून लिहिले गेलेले आहे. अर्थात तेवढं वाङ्मयीन कर्तृत्व या दोनही कलावंतांचं होतं, यात वाद नाही. पण तसं पठ्ठे बापूरावांच्या बाबतीत का घडलेलं नाही, हा खरा प्रश्न आहे. या प्रश्नाच्या उत्तरात विदारक सत्यं दडलेली आहेत.
एकदा लिहिलेली लावणी पुन्हा लिहायची नाही; लावणी लिहिण्यासाठी एकदा कागदावर लेखणी टेकविली की ती लावणी लिहून झाल्याशिवाय कागदावरची लेखणी उचलायची नाही; शिळ्या पैशाचं तोंड बघायचं नाही, असा पठ्ठे बापूराव यांचा पण होता; असं बापूरावांच्या संबंधात बोललं जातं.
कलानिर्मिती ही उर्मी व वृत्ती यांच्याशी निगडीत असते. त्यामुळे एकटाकी लावणी लिहिणे अथवा लावणी लिहून झाल्यानंतर तिच्यात दुरुस्ती अथवा फेरबदल न करणे आपण समजू शकतो. पण शिळ्या पैशाचं तोंड बघायचं नाही, ही गुर्मी कलावंत कितीही मोठा असला तरी त्याला असू नये. नसता काय होतं याचं प्रत्यक्ष उदाहरण स्वतःच पठ्ठे बापूराव आहेत. पठ्ठे बापूराव यांना आपल्या आयुष्यातले अखेरचे दिवस केवळ हालअपेष्टातच नाही तर ताई परिंचेकर या मजूर स्त्रीच्या घासातल्या अर्ध्या घासावर व्यतीत करावे लागले आहेत.
काळ कोणताही असो, त्या काळात जन्मलेला कलावंत कितीही मोठा असो, रसिकांनी त्याला जे दिलेलं असतं ते उधळण्यासाठी दिलेलं नसतं. पण याचं भान न ठेवता ते कलावंतानं उधळून दिलं व त्यामुळे तो 'उघडा' पडला तर त्याचं फारसं दुःख त्याच्या रसिकांनी मानू नये. पुढच्याला ठेच लागली तर निदान मागचा तरी शहाणा होईल !
(संपादित)
प्रा. चंद्रकुमार नलगे
'महाराष्ट्राचे शिल्पकार पठ्ठे बापूराव' या प्रा. चंद्रकुमार नलगे लिखित पुस्तकातून.
सौजन्य- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
इतर संदर्भ लेख