A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आई आणखी बाबा यातून

सांग मला रे सांग मला
आई आणखी बाबा यातून कोण आवडे अधिक तुला?

आई दिसते गोजिरवाणी, आई गाते सुंदर गाणी
तर्‍हेतर्‍हेचे खाऊ येती बनवायाला सहज तिला !
आई आवडे अधिक मला !

गोजिरवाणी दिसते आई परंतु भित्री भागुबाई
शक्तिवान किती असती बाबा थप्पड देती गुरख्याला !
आवडती रे वडील मला !

घरात करते खाऊ आई, घरातल्याला गंमत नाही
चिंगम अन्‌ चॉकलेट तर बाबा घेती रस्त्याला !
आवडती रे वडील मला !

कुशीत घेता रात्री आई थंडी-वारा लागत नाही
मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला !
आई आवडे अधिक मला !

निजता पण रे बाबांजवळी भुते-राक्षसे पळती सगळी
मिशा चिमुकल्या करती गुदगुल्या त्यांच्या अपुल्या गालाला !
आवडती रे वडील मला !

आई सुंदर कपडे शिवते, पावडर-तिट्टी तीच लावते
तीच सजविते सदा मुलींना रिबीन बांधुन वेणीला !
आई आवडे अधिक मला !

त्या रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवुनि आणती
कुणी न देती पैसा-दिडकी घरात बसल्या आईला !
आवडती रे वडील मला !

बाई म्हणती माय पुजावी, माणूस ती ना असते देवी
रोज सकाळी नमन करावे हात लावुनी पायाला !
आई आवडे अधिक मला !

बाबांचा क्रम वरती राही, त्यांच्या पाया पडते आई !
बाबा येता भिऊन जाई, सावरते ती पदराला !
आवडती रे वडील मला !

धडा शीक रे तू बैलोबा, आईहुनही मोठ्ठे बाबा
म्हणून आया तयार होती बाबांसंगे लग्‍नाला !
आवडती रे वडील मला !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.