सुखद स्मृतींच्या कल्लोळांनीं काळिज काजळतें
वात्सल्याचा कुठें उमाळा, तव हाताचा नसे जिव्हाळा
हृदयाचें मम होउन पाणी, नयनीं दाटुन येतें
आई तुझ्याविण जगीं एकटा, पोरकाच मज म्हणति करंटा
व्यथा मनींची कुणास सांगूं, काळिज तिळतिळ तुटतें
हाक मारितों 'आई' 'आई', चुके लेकरूं सुन्या दिशाही
तव बाळाची हाक माउली, कां नच कानीं येते?
गीत | - | बाळ कोल्हटकर |
संगीत | - | भालचंद्र पेंढारकर |
स्वर | - | भालचंद्र पेंढारकर |
नाटक | - | दुरितांचें तिमिर जावो |
राग | - | मांड, हिंडोल पंचम |
गीत प्रकार | - | आई, नाट्यसंगीत |
नुरणे | - | न उरणे. |
या नाटकाचा प्रयोग करण्याचं श्री. भालचंद्र पेंढारकर यांनीं ठरवलं तें कै. बापूसाहेब पेंढारकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं ! अर्थात् मला आनंद होणं अपरिहार्य होतं ! तेव्हां त्यांच्या अविश्रांत मेहनतीची पुण्याई माझ्या या नाटकामागं उभी असल्यानं त्यासाठीं मीं प्रस्तावना लिहिण्याचं कारण नाहीं ! तरीहि मला आपल्या बरोबरीनं या नाटकाच्या निमितानं उभं राहण्याची संधि श्री. पेंढारकर यांनीं दिलीं याबद्दल त्यांचे आभार मानतोंच, पण त्याचबरोबर मीं त्या संस्थेला आतांपर्यंत माझी पांच नाटकं दिली, त्या संस्थेच्या चालकांचेहि मला आभार मानायला हवेत !
श्री. जयराम शिलेदार यांची 'मराठी रंगभूमि' आणि त्यावर वावरणारे श्री. वैशंपायन, चाफेकर, श्री. हंसराज कोरडे या लोकांशीं माझे संबंध जर इतके निगडित झाले नसते तर कदाचित मीं हें नाटक लिहिलंहि नसतं ! त्या सर्वांचा मी अतिशय आभारी आहें. माझे चुलतबंधू श्री. बाळूदादा कोल्हटकर आणि श्री. चित्तरंजन या दोघांनीं माझ्यासाठीं माझ्या नकळत केलेली प्रस्तावना माझ्या उपयोगी पडली आणि मला अपेक्षा नसतांना हा प्रयोग या संस्थेनं बसवण्याचं भाग्य माझ्या पदरीं पडलं ! श्री. मामा पेंडसे यांनी मला अनेक उपयुक्त सूचना दिल्या. त्यांचाहि मी ऋणी आहे.
माझे चुलते ती. चिंतामणराव कोल्हटकर यांनीं केलेल्या वडिलकीच्या अनेक सूचना माझ्या नेहमींच उपयोगी पडत आल्या, तेव्हां लहान तोंडीं आभाराचा मोठा घास न घेतां मी त्यांचे आशीर्वाद मागतों. नटवर्य बाबुराव पेंढारकर नेहमींच आपल्या आपुलकीच्या स्वभावानं मला उपकारक ठरले. या नाटकांतल्या बर्याच चांगल्या गोष्टींना तेच कारण आहेत ! त्यांचेहि आभार मानून सदैव त्यांची कृपा इच्छितों !
श्री. पु. श्री. काळे यांच्या अनुभवी आणि कुशल कुंचल्यांतून रंगभूमीवर उतरलेले मोहक रंग जर मदतीला नसते तर कोण जाणे काय झालं असतं !
आश्चर्य वाटेल कुणाला, पण नागपूरचे दानशूर श्रीमंत श्री. बेहरामजी आणि सौ. सुशिलाबाई बेहरामजी यांनीं या नाटकाची कथा-वस्तु माझ्या डोक्यांत भरवली. या गोष्टीची त्यांना कल्पना नसेल आणि आतां मी त्यांचे मानत असलेले आभारहि कदाचित् त्यांना कळणार नाहींत. पण माझं कर्तव्य मला केलंच पाहिजे.
सिद्धहस्त साहित्यिक श्री. पु. ल. देशपांडे यांचा माझा परिचय जुना आहे. म्हणजे मी त्यांना ओळखतों ! त्यांची माझी नुकतीच जेव्हा संघ मंदिरांत भेट झाली, तेव्हां त्यांनी जी कौतुकानं माझ्या पाठीवर थाप मारली, त्यानं मी पुराच दबला गेलों ! त्यांच्या अंगच्या या खिलाडू वृत्तीचा मी सदैव ऋणी राहीन ! त्यांच्यासारख्या प्रथितयश विद्वानांची ही नाट्यलेखनाची पाऊलवाट मीं मळवायला सुरवात केली त्याबद्दल त्यांनीं मला क्षमा करावी. 'मराठी रंगभूमी'वर रांगायला सुरवात केलेल्या या 'बाळा'ला सहानुभूतीचा हात देऊन त्यांनीं चालायला शिकवावं, हीच प्रार्थना.
पं. महादेवशास्त्री जोशी यांच्या 'पर्जन्यकुंड ' या सुप्रसिद्ध गोष्टींतली मूळ कल्पना या नाटकाला कुठं कुरवाळून गेली असली तर तो त्यांच्या कथेचा सहृदय जिव्हाळा माझ्या उपयोगी पडला ! त्यांचं ऋण मानलं नाहीं तर तो एक अक्षम्य अपराध ठरेल !..
हें नाटक म्हणजे एका दगडाची गोष्ट आहे. तेव्हां कुणाला यांत दोष दिसतील तर कुणाला गुणहि सांपडतील, बाकी जरी कांहीं नसलं तरी 'दुरितांचे तिमिर जावो' ही सदिच्छा या गोष्टीच्या मुळाशीं निश्चित आहे ! तेव्हां 'जो जें वांच्छील तो तें लाहो, प्राणिमात्र' असं म्हणून मी, वाचकांची त्यांच्याशीं केलेल्या सलगीबद्दल क्षमा मागून रजा घेतो.
बाळ कोल्हटकर
दि. २८ मार्च १९५७
'दुरितांचें तिमिर दुरितांचें जावो' या नाटकाच्या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- ग. पां. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
५० वर्षांची अभिमानास्पद परंपरा असलेल्या महाराष्ट्रांतील 'ललितकलादर्श' या रसिकांच्या आवडत्या नाट्यसंस्थेद्वारां हें नाटक रंगभूमीवर आलें. सुवर्ण महोत्सवाचें भाग्य ललितकलादर्शला लाभलें त्यासमवेत 'दुरितांचे तिमिर जावो' या नाटकास अखिल भारत यशस्वी दौर्याचें भाग्य लाभलें ! नाटकाची ही तिसरी आवृत्ति ! त्यांतून २ वर्षांच्या अल्पावधींतच निघालेली ! मला आनंद होणें अपरिहार्य आहे ! पण मला जास्त आनंद होण्याचें कारण या सर्व यशाचें श्रेय 'ललितकलादर्श'चे कष्टाळू, धाडसी, कल्पक निर्माते व चालक श्री. भालचंद्र पेंढारकर यांचेकडे जातें हें आहे ! तेव्हां, ज्यांच्या परिश्रमांना पार नाहीं अशा 'ललितकलादर्श'च्या सर्व सहकारी कलावंतांचे यावेळीं आभार मानायला हवेत ! "खास लोकाश्रयाखालील" हे बिरुद्ध अभिमानानें उराशीं बाळगणार्या 'ललितकलादर्श'ला हा संजीवनीचा जोम देणारे सर्व भारतांतील नाट्यरसिक माझेही उपकारकर्ते आहेत !
भारतकीर्तीचे संगीतरचनाकार वसंतराव देसाई यांनी नाटकाबद्दल व त्यांतील संगीताबद्दल गौरवोद्गार काढले. संगीतरसज्ञ श्री. केशवराव भोळे यांनी तर, असें ओवीबद्ध व नाटकाचा रसपरिपोष करणारें संगीत योजल्याबद्दल पेंढारकरांना धन्यवाद देऊन आधुनिक नाटकांत नवीन पाऊल टाकल्याची ग्वाही दिली.
सध्याच्या रंगभूमीवरील विनोदी नाटकांच्या जमान्यांत या नाटकासारखी गंभीर प्रकृतीची शोकांतिका अत्यंत यशस्वी व्हावी, हा रंगभूमीच्या आधुनिक इतिहासांतला एक महान चमत्कारच समजला पाहिजे. 'दुरितांचे तिमिर जावो' या ज्ञानेश्वरांच्या आशीर्वादाने नटेश्वरांची पूजा 'ललितकलादर्श'नें बांधली आणि तिचें तिमिर दूर होऊन भारतदौर्याचा प्रकाश तिला दिसला. खास लोकाश्रयावर हा दौरा यशस्वी करणारी 'ललितकलादर्श', तिचे प्रमुख भालचंद्र पेंढारकर आणि त्यांचे सर्व सहकारी कलावंत यांना याही पुढे, जगाचा दौरा करून येण्याचे सामर्थ्य मिळावे आणि माझ्या हातून याहीपेक्षा रसिकांची सेवा घडावी, अशी ज्ञानेशांचे चरणी प्रार्थना करून पुन्हा एकदा म्हणतों,
'दुरितांचे तिमिर जावो
(संपादित)
बाळ कोल्हटकर
'दुरितांचें तिमिर दुरितांचें जावो' या नाटकाच्या पुस्तकाच्या पाचव्या आवृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- ग. पां. परचुरे प्रकाशन मंदिर, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.