A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आईचा छकुला चिमुकला

आईचा छकुला, चिमुकला
आईचा छकुला !

चपल सदा रुसलेला दिसला
आईचा छकुला !

वाहिली राहिली माया
डोळां ज्या पहाया
का हळू हसला
माया जिवाला लावियलेला !
गीत - भा. वि. वरेरकर
संगीत -
स्वर- गंगुबाई हनगल
गीत प्रकार - भावगीत
एच.एम.व्ही. एन.५१३६ ह्या क्रमांकाची ही ध्वनिमुद्रिका बाजारात आली तेव्हां तिच्या वेष्टणावरती मजकूर होता तो असा "माय भगिनींनों ! कन्‍नड कोकिळा गांधारी हनगल हीचा वत्सलरसानें ओथंबलेला - { आईचा छकुला ! बाळाचा चाळा ! } - मामा वरेरकर कृत हा रेकोर्ड स्वत: ऐकाच आणि मुलांबाळांनाही ऐकवा, अन लेकरांचं कोडकौतुक पुरवा !!

१९३२-३३ च्या सुमारास प्रकाशित झालेली ही ध्वनिमुद्रिका एच.एम.व्ही. कंपनीच्या दुकानांतून हातोहात खपली. इतकी की तिच्या अल्पावधीत नवीन प्रती काढाव्या लागल्या. आई व चिमुकला ह्यांच्या भावबंधनावर आधारित हे अंगाई गीत असल्यानं सर्वांनाच फार आवडलं. हे चार ओळींचं पद वा भावगीत लिहिलं होतं सुप्रसिद्ध नाटककार श्री.भा.वि. तथा मामासाहेब वरेरकर ह्यांनी. अतिशय सोपी चाल, कुणीही गुणगुणावी अशी. ती घरोघरी पोहोचली. ह्याच्या गायिका श्रीमती गंगूबाई हनगळ हे नाव ज्याच्या त्याच्या परिचयाचं झालं. पुढे गांधारी हनगल ह्या नावानं खूप ध्वनिमुद्रिका निघाल्या.

कर्नाटकात हुबळी येथे १९३२ च्या सुमारास ग्रामोफोन कंपनीची अधिकारी मंडळी ध्वनिमुद्रिकांसाठी नवीन आवाजाच्या शोध मोहीमेवर आली होती. त्यांनी आई अंबाक्का व मुलगी गंगूबाईंच्या लोकप्रिय गाण्यांचं मुद्रण करुन नेलं. पुढं अंबाक्का वारल्या. एच.एम.व्ही. कंपनीनं गंगूबाईंना मुंबईला बोलावून घेतलं. गावोगावच्या निवडक कलाकारांची गिरगावात एका हॉटेलात उतरण्याची सोय, प्रवास भत्ता देऊन केलेली होती. मानधन नाममात्र होतं. प्रत्येकानं १२ गाण्याची यादी द्यायची होती. गंगूबाईंनी गीत, गज़ल, शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, भावगीत मुद्रित केलं. ह्या ध्वनिमुद्रिका खूप खपल्या. परिणामी १९५० पर्यांत पन्‍नासहून अधिक गाणी ७८ गतीच्या ध्वनिमुद्रिकांवर वितरित झाली. त्यातली वीसेक गाणी मराठी भावगीते होती. त्यातला आवाज फारच वेगळा, उंच स्वरातला व मुख्य म्हणजे स्त्रीचा वाटतो. पुढं त्यांचा आवाज खूप बदलला, इतका की रसिक त्यांना प्रेम व आदराने 'गंगूबुवा' म्हणू लागले.

काळाच्या ओघात गंगूबाईंच्या शास्त्रीय संगीताच्या ध्वनिमुद्रिका अधिक गाजल्या व मराठी गाणी मागे पडली. अलीकडेच त्यांच्या भेटीचा योग आला असता ह्या गाण्यांची सी.डी. मी त्यांना भेट दिली. गाणी ऐकून त्या अतिशय खुष झाल्या. 'ही गाणी कोणी ऐकतो काय?' असं त्यांनी मला विचारलं. ध्वनिमुद्रणावेळेच्या अनेक आठवणीही सांगितल्या. त्यावेळी मुलगी (कृष्णा हनगल) तान्ही होती. तिला घेऊनच स्टुडियो मध्ये जावं लागे. ती दूध पिऊन झोपली की ध्वनिमुद्रण होत असे. जागी असली तर स्टाफ मधली मंडळी तिला खेळवत असत. अशा अनेक आठवणींना उजाळा मिळाला.
(संपादित)

सुरेश चांदवणकर
सौजन्य- marathiworld.com
(Referenced page was accessed on 28 August 2016)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.