A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आज चांदणे उन्हात हसले

आज चांदणे उन्हात हसले तुझ्यामुळे
स्वप्‍नाहुन जग सुंदर दिसले तुझ्यामुळे!

भाव अंतरी उमलत होते
परि मनोगत मुकेच होते
शब्दांतुन साकार जाहले तुझ्यामुळे, तुझ्यामुळे!

परोपरीचे रंग जमविले
स्तब्धच होते करी कुंचले
रंगांतुन त्या चित्र रंगले तुझ्यामुळे, तुझ्यामुळे!

करात माझ्या होती वीणा
आली नव्हती जाग सुरांना
तारांतुन झंकार उमटले तुझ्यामुळे, तुझ्यामुळे!

हृदयमंदिरी होती मूर्ती
तिमिर परंतू होता भवती
आज मंदिरी दीप तेवले तुझ्यामुळे, तुझ्यामुळे!
कुंचला - रंग देण्याचा ब्रश.