A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आज कां निष्फळ होती बाण

आज कां निष्फळ होती बाण?
पुण्य सरें कीं सरलें माझ्या बाहूंमधलें त्राण?

शरवर्षावामाजीं दारुण
पुन्हां तरारे तरूसा रावण
रामासन्मुख कसे वांचती रामरिपूचे प्राण?

चमत्कार हा मुळिं ना उमजे
शीर्ष तोडितां दुसरें उपजें
रावणांग कीं असे कुणी ही सजिव शिरांची खाण?

शत शिर्षे जरि अशीं तोडिलीं
नभीं उडविलीं, पदीं तुडविलीं
पुन्हां रथावर उभाच रावण, नवें पुन्हां अवसान

इंद्रसारथे, वीर मातली
सांग गूढता मला यांतली
माझ्याहुन मज असह्य झाला विद्येचा अपमान

वधिला खर मी, वधिला दूषण
वधिला मारिच, विराध भीषण
हेच बाण ते केला ज्यांनी वाली क्षणिं निष्प्राण

ज्यांच्या धाकें हटला सागर
भयादराचे केवळ आगर
त्या भात्यांतच विजयि शरांची आज पडे कां वाण?

सचैल रुधिरें न्हाला रावण
सिंहापरी तरि बोले गर्जुन
मलाहि ठरला अवध्य का तनुधारी अभिमान?

सचिंत असतिल देव, अप्सरा
सुचेल तप का कुणा मुनिवरा?
व्यर्थच झालें काय म्हणूं हें अवघें शरसंधान?
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - मिश्र आसावरी
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- २३/२/१९५६
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- सुधीर फडके.
आगर - वसतिस्थान.
खर-दूषण - रावणाचे सावत्र भाऊ. शूर्पणखेची रामाकडून विटंबना झाल्यामुळे खर आणि दूषण रामावर चालून गेले व त्याच्या हातून मरण पावले.
मातली - इंद्राचा सारथी.
मारिच - एक राक्षस. ताटिकेचा (त्राटिका) ज्येष्ठ पुत्र. सुबाहु बंधु. याने सुवर्णमृगाचे रूप धारण करून रामास दूर नेले आणि मग रावणाने सीता उचलून नेली.
रिपु - शत्रु.
विराध - दंडकारण्यातील एक राक्षस.
शर - बाण.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण