होडीला देइ ना ग ठरूं,
सजणे, होडीला बघतोय् धरूं !
हिरवं हिरवं पाचूवाणी जळ,
सफेत् फेसाची वर खळबळ,
माशावाणी काळजाची तळ्मळ,
माझि होडी समिंदर, ओढी खालींवर,
पाण्यावर देइ ना ग ठरूं,
सजणे, होडीला बघतोय् धरूं !
तांबडं फुटे आभाळांतरीं,
रक्तावाणी चमक् पाण्यावरी;
तुझ्या गालावर तसं काहीतरी !
झाला खुळा समिंदर, नाजुक् होडीवर
लाटांचा धिंगा सुरू
सजणे, होडीला बघतोय् धरूं !
सूर्यनारायण हंसतो वरी
सोनं पिकलं दाहिदिशांतरीं
आणि माझ्याहि नवख्या उरीं !
आला हंसत समिंदर, डुलत फेसावर
होडीशीं गोष्टी करूं
सजणे, होडीला बघतोय् धरूं !
गोर्या भाळीं तुझ्या लाल् चिरी,
हिरव्या साडीला लालभडक धारी;
उरीं कसली ग, गोड शिरशिरी?
खुशी झाला समिंदर, त्याच्या उरावर
चाले होडी भुरुभुरू
सजणे, वार्यावर जणुं पांखरूं !
गीत | - | अनंत काणेकर |
संगीत | - | केशवराव भोळे |
स्वर | - | ज्योत्स्ना भोळे |
गीत प्रकार | - | कोळीगीत |
चिरी | - | बारीक रेघ / कुंकू. |
धारी | - | किनार. |
१९३४ साली पुण्यातल्या प्रयोगात हे गीत 'आंधळ्यांची शाळा' या नाटकात प्रथम त्यांनी गायले. नाटकात त्याची जरूर नव्हती; पण दात्यांच्या आग्रहाकरता ते गायले ! मग जवळजवळ प्रत्येक खेळात ते म्हणणे भाग पडले. चाल सोपी, गीताला शोभणारी, झोकेदार ! नाटकातून ते मैफलीत उतरणे ते क्रमप्राप्त होते. मैफलीतून ते रेडिओवर गेले आणि सर्व श्रोत्यांपर्यंत पोचले यात नवल कसले ! अर्थात हे क्रमाक्रमाने आणि कालांतराने झाले. पण तेवढ्या कालात दर्यागीताची नक्कल होणेही अटळ होते. 'वारा फोफावला' (फोफावला की सोसाटला? झाडे फोफावतात..) आणि दर्यागीतांना उधाण आलं.
या अमाप पिकांच्या आधारावर भविष्यकाळात "महाराष्ट्रीय लोक त्याकाळी फारच दरियावर्दी होते असा शोध इतिहाससंशोधक काढतील." असा उपरोधी निष्कर्ष श्यामराव ओकांनी काढला. पण महाराष्ट्रीयांच्या जीवनात शिमगा-गणपतीकरता कोकणात जाण्यापुरताच दर्या येत असे, हाही त्यांनीच एक खोचक उपरोधी निर्णय 'अमरज्योती' या 'प्रभात'च्या भारतीय दर्यावर्दी जीवनावरील पहिल्या चित्रपटाबद्द्ल दिला होता.
(संपादित)
केशवराव भोळे
माझे संगीत - रचना आणि दिग्दर्शन
सौजन्य- मौज प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.