A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आला पाऊस मातीच्या वासात

आला पाऊस मातीच्या वासात ग
मोती गुंफीत मोकळ्या केसांत ग!

आभाळात आले काळेकाळे ढग
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत ग!

कोसळल्या कशा सरींवर सरी
थेंब थेंब करी नाच पाण्यावरी
लाल ओहळ वाहती जोसात ग!

लिंबोळ्यांची रास कडूलिंबाखाली
वारा दंगा करी जुई शहारली
चाफा झुरतो फुलांच्या भासात ग!

झाडांवरी मुके पाखरांचे थवे
वीज लालनिळी कशी नाचे लवे
तेजाळते उभ्या अवकाशात ग!

वीज कडाडता भय दाटे उरी
एकली मी इथे सखा राहे दुरी
मन व्याकुळ सजणाच्या ध्यासात ग!
निवणे - शांत होणे.
लवणे - वाकणे.