A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आली बघ गाई गाई

आली बघ गाई गाई शेजारच्या अंगणात
फुललासे निशिगंध घोटाळली ताटव्यात

आली बघ गाई गाई चांदण्यांचे पायी चाळ
लाविले का अवधान ऐकावया त्यांचा ताल?

आली बघ गाई गाई लावी करांगुली गाली
म्हणुन का हसलीस उमटली गोड खळी

आली बघ गाई गाई लोचनांचे घेई पापे
म्हणून का भारावले डोळे माझ्या लाडकीचे?

आली बघ गाई गाई कढितसे लांब झोका
दमलीस खेळूनिया झाक मोतियांच्या शिंपा
गीत - इंदिरा संत
संगीत - कमलाकर भागवत
स्वर- सुमन कल्याणपूर
गीत प्रकार - बालगीत