A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आषाढाच्या पहिल्या दिवशी

आषाढाच्या पहिल्या दिवशी अवचित दिसशी मला
म्हणुनिया विनवित मेघा तुला

रामगिरीवर एक यक्ष मी
काळ कंठितो विरही कामी
कसा सांगु मी शाप भोगतो व्यथा जाळते मला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला

स्वीकारी या कुटजफुलांते
ऐक प्रार्थना प्रसन्‍नचित्ते
स्वागत करितो प्रीतिवचाने प्रणयी हा पोळला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला

तुला पाहुनी सुखासीनही
कातर होती, होती विरही
कथा काय मग कंठमिठीचा प्रिय ज्यांचा तुटला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला

तप्तांचा तू असशी आश्रय
इंद्रसचिव तू, तू करुणामय
निरोप माझा घेउनी जाई अलकानगरीला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला

प्रिया दूर मम तिला भेटशिल
मनी वाटते नाहि न म्हणशिल
विफल विनवणी सुजनी बरवी नको शठीं सफला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला

कुठला घ्यावा मार्ग प्रथम तो
सांगुनि नंतर निरोप कथितो
दूत होऊनि पोचिव माझ्या दुःखी दयितेला
म्हणुनिया, विनवित मेघा तुला
गीत - वसंतराव पटवर्धन
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर- पं. जितेंद्र अभिषेकी
गीत प्रकार - गीत मेघ, ऋतू बरवा, मालिका गीत, कविता
  
टीप -
• गीत क्रमांक १
• 'गीत मेघ' - अनुवादित 'मेघदूत'मधून
• वाहिनी- सह्याद्री, कार्यक्रम - 'प्रतिभा आणि प्रतिमा' (१९८०)
• निवेदन- ज्योत्‍स्‍ना किरपेकर
• सादरकर्ते- अरुण काकतकर
• ध्वनीफीत सौजन्य- डॉ. वसंतराव पटवर्धन
कुटज - एक प्रकारचे जंगलात सापडणारे फूल. (वनस्पतीचे शास्‍त्रीय नाव- Wrightia antidysenterica)
दयित - प्रिय, आवडता.
बरवा - सुंदर / छान.
शठ - लुच्‍चा, ठक.
पृथक्‌

कश्चित्कान्ताविरहगुरुणा स्वाधिकारात्प्रमत्तः
शापेनास्तङ्गमितमहिमा वर्षभोग्येण भर्तुः ।
यक्षश्चक्रे जनकतनयास्‍नानपुण्योदकेषु
स्‍निग्धच्छायातरुषु वसतिं रामगिर्याश्रमेषु ॥

संदर्भ- महाकवि कालिदास कृतम्‌ 'मेघदूतम्‌'
श्लोक १, पूर्व मेघ
सौजन्य- राष्ट्रीय पुस्तकालय, कलकत्ता (भारत सरकार)

  पृथक्‌

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.