A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आसमंती आज राती शुभ्र

आसमंती आज राती शुभ्र धारा
खोल पात्री हा स्वरांचा ये शहारा

रूप ना हे पाहिले मी
सूर ना हे ऐकिले मी
येत कानी दशदिशांचा हा पुकारा
गारगोटी तू, नव्हे आकाश तारा

आंधळी अन वेंधळी मी
मृत्तिकेची बाहुली मी
व्यर्थ मी शृंगार केला जाळणारा
कल्पनेचा सर्व गळला तो पिसारा

अप्सरा ना मेनका ना
रुपवंती बालिका ना
आणि कृष्णाची न राधा, मी न मीरा
तोडुनी तारुण्य गेले हृदयतारा

मी कुणी सामान्य पोर
कापिले मी सर्व दोर
गर्व गेला, आज गेला नूर सारा
बांधिले गेले शरीरा अंधकारा
गीत - आरती प्रभू
संगीत - गजानन वाटवे
स्वर- अनुराधा मराठे
गीत प्रकार - भावगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.