A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आठवे अजुनी यमुनातीर

आठवे अजुनी यमुनातीर
तुझ्या मुरलीचे सूर मनोहर, शीतल सांज समीर

कळते मज की मी पर-नारी
सुखी असावे मी संसारी
पुन्हा न दिसणे सखा श्रीहरी
भासामागे तरीही धावे वेडे चित्त अधीर

प्रीत पतीची लाभे निर्मळ
घरात नांदे भरले गोकुळ
तरी न विसावे हे मन चंचल
सौख्य छळे मज दु:खासम हे डोळा दाटे नीर

हरपुन गेले त्याच्यासाठी
खुळा हुंदका येतो ओठी
उरी ठरे ना, ठरे न पोटी
गूजासह या कैसी गाठू या जन्माचे तीर

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.