A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ऐकलात का हट्ट नवा

ऐकलात का हट्ट नवा?
रामाला ग चंद्र हवा! चंद्र हवा! चंद्र हवा!

कौसल्येच्या मांडीवरती राममूर्ति ग खेळत होती
रम्य आणखी अवतीभवती पसरली होती ती पुनवा
खेळतखेळत खिडकी मधुनी चंद्र पाहिला युवराजांनी
त्यास भासला दिवाच दुरुनी चमचमणारा तो फसवा!

काय तरी हें अघटित बाई, चंद्र कसा हाताला येइ
बाळ कुणाचे ऐकत नाही, महाराजांना जा कळवा!

कुणि समजवा बाळाला या, थकल्या त्याच्या तिन्ही आया
दमल्या सार्‍या दासी-दाया, फूल पुन्हा हें कुणि फुलवा

रामानी आकांत मांडिला, चतुर मंत्री सुमंत आला
समजाविल तो या रामाला, त्यास वाट द्या बाजूस व्हा
अहा पहा ग आरशांतला चंद्र पाहुनी राम हांसला
साखर वाटा जा नगरीला, प्रजाजनांना जा हसवा

रामाला ग चंद्र दिला, चंद्र दिला, चंद्र दिला!