A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ऐकशील माझे का रे

ऐकशील माझे का रे अर्थहीन गीत?
दूरदूर जाते धरुनी उरी तुझी प्रीत!

वाट तुझी बघता दारी पाय थकुन गेले
निमंत्रणावाचुनि जवळी मरण मात्र आले
फेकलेस चरणावरचे फूल तू धुळीत!

भाग्य हेच अजुनि येतो गंध पाकळीस
स्पर्श तुझा झाला होता चुकुन या कळीस
उमलतांच सुकले तरीही आयु हे पुनीत!

सूर आर्त गीताचा या तुझ्या घरी यावा
अश्रुबिंदु एकच नयनी तुझ्या ओघळावा
हेतु एक शेवटचा या थरथरे मनात!
गीत- ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - आशा भोसले
चित्रपट- लाखाची गोष्ट
गीत प्रकार - चित्रगीत
आर्त - दु:ख, पीडा.
पुनीत - शुद्ध, पवित्र.