A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अजून तरळते दृष्टीपुढती

अजून तरळते दृष्टीपुढती ते मोराचे पीस निळे
झिळमिळत्या रंगांचे गारुड अजून मला पुरते नकळे !

ती मुरली ती तुडुंब यमुना कदंब फुलले काठी
खरेच का तो होता तिथला गोकुळचा रहिवासी?
खरीच होती राधा अन्‌ तो रास खरा होता का?
नवलपरीच्या लीला त्याच्या भासच तो होता का?
त्या अविनाशी मूलपणाचे रहस्यही पुरते नकळे !

तो तर होता गोपसखा की तरुण प्रियकर होता
धीट किती तो लोकप्रिय किती नित्य अग्रणी होता
मधुवचनी तो मुरलीमनोहर रूपवंत वेल्हाळ
समयज्ञही तो चतुर जाणता शत्रुंजय कळिकाळ
त्या नितनूतन शत रूपांचे रहस्यही पुरते नकळे

तो बंधु तो पती पिता तो परम मित्र तो राजा
तो द्रष्टा उपदेशक प्रेरक आश्रय तो सकलांचा
सर्वांसाठी सहृदय तरीही तो तर त्या पलीकडचा
अलिप्त सावध निर्मम साक्षी सगळ्या सुखदु:खांचा
अपूर्व त्या जीवनयोगाचे रहस्यही पुरते नकळे

सर्व मानवी नात्यांना अति सुंदर केले त्याने
आयुष्याला अर्थ दिला रसभरल्या चैतन्याने
काय म्हणावे? काय नेमके द्यावे त्याला नाव?
काळाचा होता का स्वामी, तो होता का देव?
गूढ निळ्या त्या अस्तित्वाचे रहस्यही पुरते नकळे !
अग्रणी - नेता, मुख्य.
कदंब (कळंब) - वृक्षाचे नाव.
कळिकाळ - संकट.
वेल्हाळ - परम प्रीतिपात्र.
समयज्ञ - काळवेळ ओळखणारा.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.