सुचत कसा नवलाचा चाळा? ॥
हांसवी नाचवि ह्या जीवा । हृदयिंच्या राजिवा ! ।
सोडुनि रुसवा । बोल सुधेच्या मंजुळा बोला ॥
गीत | - | स. अ. शुक्ल |
संगीत | - | शंकरराव सरनाईक |
स्वर | - | शंकरराव सरनाईक |
नाटक | - | संगीत सत्याग्रही |
राग | - | मिश्र पिलू |
ताल | - | त्रिताल |
गीत प्रकार | - | नाट्यसंगीत |
राजीव | - | कमळ / प्रिय. |
सुधा | - | अमृत / सरळ, योग्य मार्गाने जाणारा. |
आधुनिक नाट्य-तंत्रानुसार जरी या नाटकांत 'स्वगतें' घालण्याचें मी शक्यतों टाळलें असलें तरी प्रस्तुत 'स्व-गत', मला टाळतां येत नाहीं ! कारण, हें 'स्वगत' प्रेमळ रसिकांपुढे मांडल्यानेंच माझ्या मनाला समाधान लाभणार आहे !
'सत्याग्रही' म्हटला की त्याच्या मार्गांत अनेक विघ्नांचे डोंगर आडवे यायचेच ! हा पौराणिक 'सत्याग्रही' तरी या नियमाला अपवाद कसा ठरणार ? अनेक अकल्पित अडचणींतून मार्ग काढूनच हा 'सत्याग्रही' आज यशवंत सं. मंडळीच्या रंगभूमीवर अवतीर्ण होऊन रसिकांच्या सेवेला सादर होत आहे. योगायोगच असा विचित्र कीं, मुंबईस येऊन सुमारें दीड महिन्यापूर्वी हें नाटक मी लिहावयास घेतल्यापासूनच माझ्या शरीर-प्रकृतिनें मला दगा देण्यास प्रारंभ केला. प्रकृति-स्वास्थ्याच्या अभावी लेखनाला आवश्यक असें मनःस्वास्थ्य मला लाभलें नसतांहि, हा 'सत्याग्रही' माझ्या हातून मनाप्रमाणे लिहून पुरा झाला, याला कारण म्हणजे माझ्या व यशवंत मंडळीच्या मित्र मंडळींचा प्रेमळ प्रोत्साहक आग्रह हेंच होय ! माझे परम स्नेही, यशवंत संगीत मंडळीचे कर्तबगार मालक श्री. शंकरराव सरनाईक, उत्साही म्यानेजर श्री. बापूराव पोवार आणि मंडळीचे, तसेंच माझेहि मित्र श्री. बाबूराव मणेरीकर या त्रिवर्गानें चिकाटी धरून एक प्रकारें 'सत्याग्रह' मांडूनच हा 'सत्याग्रही' हाताला धरून माझ्याकडून लिहून घेतला, असें म्हटलें असतां मुळींच अतिशयोक्ति होणार नाहीं. 'सत्याग्रही'चें सारे श्रेय त्यांनाच आहे. नाटक लिहून पुरे झाल्यानंतरहि अशाच कांहीं अडचणी एकामागून एक येऊं लागल्या कीं, हें नाटक मुंबई मुक्कामी व्यवस्थित स्वरूपांत रंगभूमिवर येण्याचा योग लाभतो कीं नाहीं, याचीच वानवा वाटूं लागली. परंतु, परमेश्वरकृपेनें सर्व अडचणी दूर होऊन आज प्रथम प्रयोगाचा सुदिन उगवला ! असो.
'सत्याग्रही'च्या संगीत विभागासाठीं पदांच्या सुश्राव्य व रसपरिपोषक चाली मुख्यतः महाराष्ट्र-कोकिळ श्री. शंकरराव सरनाईक, मास्टर निवृत्ति सरनाईक, श्री. बाळासाहेब मणेरीकर व कु. शांता मणेरीकर यांनी दिल्या, याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.
रसिकांचा नम्र कृपाकांक्षी,
सदाशिव अनन्त शुक्ल
मुंबई ता. २८-१२-३३
(संपादित)
'सत्याग्रही' या नाटकाच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- परचुरे, पुराणिक आणि मंडळी, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.