A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अंगणात रंगली ग माहेरची

ऐलमा पैलमा गणेश देवा
माझा खेळ मांडू दे, करीन तुझी सेवा

मांडला ग मांडला वेशीच्या दारी
आता त्या पूजूया सांजच्या पारी

पूजिता पूजिता आभाळ भरलं
धरती मातेचं दूरित सरलं

अक्कण माती चिक्कण माती जातं ते रोवावं
अस्सं जातं सुरेख बाई गहू बी दळावं

अस्सं गहू सुरेख बाई सोजी बी काढावी
अश्शी सोजी सुरेख बाई पोळ्या की लाटाव्या

अश्श्या पोळ्या सुरेख बाई म्हायेरी धाडाव्या
अस्सं म्हायेर सुरेख बाई खायाला घालितं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडुनी मारितं

बारा घरच्या बारा जणी खेळितो अंगणी
अंगणात रंगली ग माहेरची गाणी

काय सांगू? माझं माहेर मोलाचं
कसं सांगू? राजा इंद्राच्या तोलाचं
माहेराचा ठेवा असा देवाजीची करणी
अंगणात रंगली ग माहेरची गाणी

चौसोपी माझा माहेरचा वाडा
मीठ-मोहर्‍यांनी दृष्ट कुणी काढा
हिरे-माणकं भरली जशी वाड्याच्या नौखणी
अंगणात रंगली ग माहेरची गाणी

माहेराची माया कुणाला गावंना?
माहेराचं सुख पदरात मावंना
आई-बाबा-दादा-वैनी सारी अबादानी
अंगणात रंगली ग माहेरची गाणी

म्हायेराचा लळा जिवाला लागीला
सासरी ग जीव आभाळी टांगीला
म्हायेरीच्या वाटं डोळं लागती की झुरणी
अंगणात रंगली ग माहेरची गाणी

म्हायेराचं दिस सुखाचं सरतील
मांडवात डोळं पाण्यानं भरतील
माहेरीच्या घरची मग होशील पाहुणी
अंगणात रंगली ग माहेरची गाणी
आबादानी - भरभराट.
दुरित - पाप.

 

  आरती हवालदार, रश्मी गाडागीळ