A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अंकुर

सखे ग सये गाऊया आता आनंदाची गाणी ग
आतल्या आत पिऊन टाकू डोळ्यांतले पाणी ग
पाण्यावर त्या एक नव्याचा फुटेल अंकुर ग
विसावयाला एक नव्याने मिळेल माहेर ग

माहेरी जाऊन एकदा फिरून लहान होऊया ग
धरून आईच्या बोटाला नवे पाऊल टाकूया ग
मायेच्या गावा मळभ सारे क्षणांत विरेल ग
मनातले जे येईल ओठी होईल सुरेल ग
तेजाची भाषा नवीन आशा डोळ्यांत हसेल ग
भल्याआडचे बुरेही तेव्हा सहज दिसेल ग

राजहंस तो सहज ओळखी मोत्यांमधले पाणी ग
फक्त विणकरा ऐकू येती धोट्यामधली गाणी ग
नि:शब्दाच्या कुशीत अलगद गुज नव्याचे रुजते ग
स्वागत करण्या त्याचे अन्‌ मग सृष्टी सारी सजते ग
तुला नि मला दाविल दिशा एक स्वत:चा तारा ग
शोधून त्याला जिंकून घेऊ खेळ हा सारा ग
गीत - मिलिंद जोशी
संगीत - मिलिंद जोशी
स्वर- मनिषा जोशी
गीत प्रकार - मालिका गीते
  
टीप -
• शीर्षक गीत, मालिका-अंकुर, वाहिनी- झी मराठी.
गुज - गुप्‍त गोष्ट, कानगोष्ट.
धोटा - विणकर्‍याच्या मागावरील उभ्या सुतांत आडवे धागे घालण्याचे साधन.
मळभ - ढग.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.