परिसा नाहीं हीन कोणी अंग ॥१॥
दीपा नाहीं पाठीं पोटीं अंधकार ।
सर्वांगे साकर अवघी गोड ॥२॥
तुका ह्मणे तैसा सज्जनापासून ।
पाहतां अवगुण मिळेचि ना ॥३॥
गीत | - | संत तुकाराम |
संगीत | - | कमलाकर भागवत |
स्वर | - | सुमन कल्याणपूर |
गीत प्रकार | - | संतवाणी |
परीस | - | स्पर्शाने लोखंडाचे सोने करणारा दगड. |
- चंदनाचे हातपाय, चंदनच असतात. परिसाचा कोणताही भाग, कोणतीही बाजू कमी दर्जाची नसते, ती परिसच असते.
- दिव्याच्या मागेपुढे अंधार नसतो, फक्त उजेडच असतो. साखर सगळीकडून गोडच लागणार.
- तुकाराम महाराज म्हणतात, सज्जन त्याप्रमाणे असतात. त्यांचे सगळे वागणे पवित्र असते. त्या वागण्यात थोडाही अवगूण अढळणार नाही.
गो. वि. नामजोशी
'संत तुकारामाची सार्थ अभंगवाणी' या गो. वि. नामजोशी लिखित पुस्तकातून.
सौजन्य- सुलभ प्रकाशन, मुंबई.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
परिसाचा स्पर्श झाला तर लोखंडाचं सोनं होतं, असं म्हणतात. पण परिसाच्या या बाजूने स्पर्श झाला तरच सोनं होईल, त्या बाजूने स्पर्श झाला तर लोखंडाचं सोनं होणार नाही, असं नसतं. दिव्याचा प्रकाश सर्व दिशांना सारखाच पसरतो, दिव्याच्या एका बाजूला प्रकाश आणि दुसर्या बाजूला अंधार असं नसतं. साखर सर्वांगाने गोड असते. वरवर गोड आणि आत कडू वा एका बाजूने गोड दुसर्या बाजूने कडू, असं होत नाही. तसंच जे सज्जन असतात, ते सर्वांगाने सज्जन असतात. त्यांच्यात अवगुण वा दोष शोधूनही सापडत नाहीत. असं तुकाराम महाराज सांगतात.
छत्रपती शिवाजी महाराज योद्धे होते. स्वराज्य निर्माण करण्यासाठी आणि ते राखण्यासाठी त्यांना युद्धे लढावीच लागली. शस्त्रे चालवावीच लागली. पण शिवरायांनी कधीही अवाजवी हिंसा केली नाही. वैयक्तिक शत्रुत्व केलं नाही. अफझलखानाला मारल्यावर त्याच्या देहाची विटंबना न करता त्याचं रितसर दफन केलं. शिवराय अभिषिक्त राजे झाले, तरी त्यांनी आपलं चारित्र्य डागाळू दिलं नाही. शत्रू स्त्रीचाही सन्मान केला. आयुष्यभर आपली शक्ती, बुद्धी, संपत्ती स्वराज्य आणि रयतेच्या भल्यासाठीच उपयोगात आणली. राज्याभिषेकाला विरोध करणार्यांनानाही सूडाने वागवलं नाही.
महात्मा जोतीराव फुले यांनी आयुष्यभर मनुस्मृतिप्रणित जुलमी व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष केला. त्यांच्यावर पुण्याच्या ब्राह्मणांनी मारेकरी घातले. शाळेत शिकवायला जाणार्या सावित्रीमाईंवर शेण फेकलं, दगड मारले. महात्मा फुले यांचा ज्यांनी सतत दु:स्वास केला, अपमान केला, अवहेलना केली, त्याच ब्राह्मण कुटुंबातील फसलेल्या विधवांसाठी महात्मा जोतीराव फुले यांनी आश्रम काढला, त्यांना आसरा दिला, त्यांची बाळंतपणं केली आणि त्यांच्यापैकीच एका विधवेचं मुल दत्तकही घेतलं.
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आपल्या बहिणीला घेऊन कर्व्यांकडे गेले. सासरी अमानुष जाच होत असलेल्या या बहिणीला कर्व्यांच्या हिंगण्याच्या आश्रमात ठेऊन, शिक्षण देऊन स्वावलंबी करावे असा त्यांचा विचार होता. पण आश्रमात ब्राह्मणेतर स्त्रीयांना प्रवेश देण्याची वेळ अजून आली नाही असं म्हणून कर्व्यांनी त्यांच्या बहिणीला प्रवेश नाकारला आणि त्यांना परत पाठवलं. महर्षी शिंदे यांनी स्वतः महिला आश्रम काढला आणि त्यात ब्राह्मणांसह सर्व जातीच्या स्त्रीयांना प्रवेश दिला. कर्वेंनी माझ्या बहिणीला प्रवेश नाकारला, म्हणून मीही माझ्या आश्रमात ब्राह्मण स्त्रीयांना प्रवेश देणार नाही, अशी भूमिका महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी घेतली नाही.
जगद्गुरू तुकाराम महाराजांना बदनाम करण्यासाठी मंबाजीने एक शरीरविक्रय करणारी स्त्री त्यांच्याकडे पाठवली. एकान्ती गाठून तुकाराम महाराजांना फसवायचं, भ्रष्ट करायचं आणि मग बदनाम करायचं असा मंबाजीचा डाव होता. पण तुकाराम महाराज विचलित झाले नाहीत.
जाई गो वो माते ।
न करी सायास ।
आम्ही विष्णुदास ।
तैसे नव्हो ॥
असं म्हणून तुकाराम महाराजांनी तिला परत पाठवलं. परस्त्री मातेसमान ही त्यांची भूमिका लोकांना सांगण्यापुरती नव्हती.
छत्रपती शिवराय, महात्मा जोतीराव फुले, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, संत तुकाराम यांच्यासारखी सज्जन माणसं, ही अंतर्बाह्य सज्जन असतात. त्यांचा सज्जनपणा हा दिखाऊ नसतो. कोणत्याही काळी, कोणत्याही प्रसंगी ते चुकीचे वागत नाहीत. लोकांतात एक सांगायचं आणि एकांतात त्याच्या विरूद्ध आचरण करायचं, असे ते नसतात.
तुकाराम महाराजांनी सज्जन माणसाचं वर्णन करण्यासाठी वापरलेल्या प्रतिमा आणि उपमा अनुपमेय आहेत. मनमोहक आहेत. त्यावरून सज्जनांच्याबद्दल तुकाराम महाराजांच्या मनात किती पराकोटीचा आदर आणि आत्मीयता आहे याचं दर्शन घडतं. दुर्जनांवर शब्दांचे आसूड ओढतांना वज्रासम कठोर होणार्या तुकाराम महाराजांची स्थिती सज्जनांचं वर्णन करतांना त्यांच्याच शब्दात सांगायचं तर 'अंतर्बाह्य नवनीत' अशी होऊन जाते.
(संपादित)
उल्हास पाटील
सौजन्य- गाथा परिवार (gathaparivar.org)
(Referenced page was accessed on 04 Nov 2021)
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.