A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अंतरिच्या खुणा माझ्या

अंतरिच्या खुणा माझ्या । ओळखसी एकला तूं ।
धुंडिती हे नेत्र कोणा । ओळखसी एकला तूं ॥

थरथरती हे ओठ माझे । ओढते पाऊल मागें ।
भरुनि कां ये ऊर माझा । ओळखसी एकला तूं ॥

ऐकतां चाहूल तुझी । मूक होई वाणी माझी ।
परि बोले मी किती मुखांनीं । ओळखसी एकला तूं ॥
पहिले नाटक 'आशीर्वाद'

'नाट्य-निकेतन' या आमच्या नाट्यसंस्थेच्या 'आशीर्वाद' नाटकाच्या प्रयोगाने मराठी रंगभूमीचे स्वरूप एकदम बदलले, असे उद्गार त्यावेळी नाट्यरसिकांच्या तोंडून स्वयंस्फूर्तीने निघाले. रॉयल ऑपेरा हाऊस या थिएटरात दर रविवारी सकाळी होणार्‍या 'आशीर्वाद' नाटकाच्या प्रयोगांनी प्रेक्षकांच्या मनाची विलक्षण पकड घेतली. काहीतरी आपण नवीन पाहिले, हा आनंद प्रेक्षकांना या नाटकाने त्यावेळी खास दिला. 'काय म्हणतो हिटलर?' हे कै. चिंतामणराव कोल्हटकरांचे रावबहादुराच्या भूमिकेतील एक वाक्य त्यावेळी फार लोकप्रिय झाले होते. या नाटकाचा प्रयोग पुण्याच्या प्रभात थिएटरात झाला, त्यावेळी कै. औंधकर एका हातात जुनी छत्री व दुसर्‍या हातात भाजीची पिशवी घेऊन एका गरीब कारकुनाच्या भूमिकेत उंबरठ्यात येऊन उभे राहताच टाळ्यांचा जो प्रचंड कडकडाट झाला, तो आवाज आमच्या कानांत अजून घुमतो आहे.

पण 'आशीर्वाद' नाटकाच्या तीन महिन्यांत झालेल्या २५ प्रयोगांनंतर हे नाटक बंद करण्यात आले. (कारण त्यावेळी सर्व नटांचे करार फक्त तीन महिन्यांचे केले होते. दर तीन महिन्यांनी एक नवीन नाटक रंगभूमीवर आणावयाचे, ही नाट्यसंस्था स्थापन करण्यापूर्वी ठरलेल्या अनेक कल्पनांपैकी एक कल्पना होती) श्री. एक्संबेकर यांचे दोन हजार रुपये, कै. साळवेकर यांचे दीड हजार रुपये व नॅशनल ग्रामोफोन कंपनीचे एक हजार रुपये असे एकूण साडेचार हजार रुपये कामाला आले, हे आढळून आले. पुन्हा नवीन नाटक रंगभूमीवर आणावयाचे तर 'नवी विटी, नवा दांडू' सुरू करणे प्राप्त होते. पण 'आशीर्वाद' नाटकाने आमच्या कर्तृत्वाची झलक लोकांना दिसल्यामुळे, कुठे शब्द टाकला तर त्याचा सहानुभूतीने विचार होण्याचा संभव आहे, अशी रास्त आशा आमच्या मनात निर्माण झाली.

त्याप्रमाणे श्री. एक्संबेकर यांच्या परिचयाचे कोल्हापूरचे कै. शंकरलाल परदेशी या रसिक गृहस्थांना भेटून त्यांच्याकडे त्यांनी पैशाबद्दल प्रश्न काढला. प्रत्यक्ष वाटाघाटीत रक्कम कर्जाऊ घेण्यापेक्षा त्यांनी आमचे भागीदारच व्हावे, असा आम्ही त्यांना आग्रह केला आणि आम्हा तिघा भागीदारांचा दहा वर्षांचा करार झाला. या दहा वर्षात अनेक आपत्ती आल्या पण आम्हा तिघा भागीदारांचा परस्परांबद्दलचा विश्वास अखंड राहिला. कै. शंकरलाल परदेशी हा माणूस तर कंपनीच्या कारभाराबदल चुकून एका शब्दाने कधी विचारपूस करीत नसे. आम्हा दोघांवर त्यांचा संपूर्ण विश्वास होता. दहा वर्षांनंतर जेव्हा भागीदारीच्या कराराची मुदत संपुष्टात आली, तेव्हा श्री. एक्संबेकर व श्री. परदेशी या उभयतांनी भागीदारीतून मुक्त होण्याची इच्छा दर्शवली. त्यावेळी कंपनीला बरेच कर्ज झाले होते.

या दहा वर्षांच्या मुदतीन कंपनीने १३ नाटके रंगभूमीवर आणली होती. या नाटकांमुळे 'नाट्य-निकेतन'ला नाट्यक्षेत्रात एक विशिष्ट स्थान प्राप्त झाले होते. नट निर्माण करण्याचे एक पीठ, असा 'नाट्य-निकेतन'चा सर्वत्र गौरव होऊ लागला. नाटकाचे प्रयोग नीटनेटके बसवण्याच्या बाबतीत प्रेक्षक मुक्तकंठाने 'नाट्य-निकेतन'ची प्रशंसा करू लागले. अनेक नटनटींनी 'नाट्य-निकेतनच्या नाटकात भूमिका करून लौकिक संपादन केला, हेही अमान्य होण्यासारखे नाही.
(संपादित)

मो. ग. रांगणेकर
'असा धरि छंद' (लेखन सहकार्य जयवंत दळवी) या पुस्तकातून.
सौजन्य- सन पब्लिकेशन्स्‌, पुणे

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.