A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अपर्णा तप करिते काननी

भस्मविलेपित रूप साजिरे आणुनिया चिंतनी
अपर्णा तप करिते काननी!

वैभवभूषित वैकुंठेश्वर
तिच्या पित्याने योजियला वर
भोळा शंकर परि उमेच्या भरलासे लोचनी!

त्रिशूल डमरू पिनाकपाणी
चंद्रकला शिरि सर्प गळ्यातुनि
युगायुगांचा भणंग जोगी तोच आवडे मनी!

कोमल सुंदर हिमनगदुहिता
हिमाचलावर तप आचरिता
आगीमधुनी फूल कोवळे फुलवी रात्रंदिनी!
गीत- शान्‍ता शेळके
संगीत - आनंदघन
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट- तांबडी माती
गीत प्रकार - चित्रगीत
अपर्णा - पार्वतीचे त्यावेळचे नाव जेव्हा शंकर प्राप्‍तीसाठी तपश्चर्या करताना तिने झाडांची पाने खाणेही सोडले होते.
कानन - अरण्य, जंगल.
दुहिता - कन्या.
पिनाकपाणी - शंकर.