A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
असा हा एकच श्रीहनुमान्

तरुन जो जाइल सिंधु महान
असा हा एकच श्रीहनुमान्‌

भुजंग धरुनी दोन्हीं चरणीं
झेपेसरशी समुद्र लंघुनि
गरुड उभारी पंखां गगनीं
गरुडाहुन बलवान्‌

अंजनिचा हा बलाढ्य आत्मज
हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज
निजशक्तीनें ताडिल दिग्गज
बलशाली धीमान्‌

सूर्योदयिं हा वीर जन्मला
त्रिशत योजनें नभीं उडाला
समजुनिया फळ रविबिंबाला
धरुं गेला भास्वान्‌

बाल-वीर हा रवितें धरितां
भरें कापरें तीन्ही जगतां
या इवल्याशा बाळाकरितां
वज्र धरी मघवान्‌

देवेंद्राच्या वज्राघातें
जरा दुखापत होय हनुतें
कोप अनावर येइ वायुतें
थांबे तो गतिमान्‌

पवन थांबता थांबे जीवन
देव वायुचें करिती सांत्वन
पुत्रातें वर त्याच्या देउन
गौरविती भगवान्‌

शस्त्र न छेदिल या समरांगणिं
विष्णुवरानें इच्छामरणी
ज्याच्या तेजें दिपला दिनमणी
चिरतर आयुष्मान्‌

करि हनुमन्ता, निश्चय मनसा
सामान्य न तूं या कपिजनसा
उचल एकदां पद वामनसा
घे विजयी उड्डाण
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - मुलतानी
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- ८/१२/१९५५
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- पं. वसंतराव देशपांडे.
अंजनी - मारुतीची आई.
अनिल - वायु, वारा.
आत्मज - पुत्र.
कपी - वानर.
क्षेत्रज - नियोगाने प्राप्‍त पुत्र.
ताडणे - मारणे, प्रहार करणे.
दिग्गज - पृथ्वी तोलून धरणारे आठ हत्ती / नरश्रेष्ठ.
दिनमणी - सूर्य.
धीमान्‌ (धी) - बुद्धीमान.
भुजंग - साप.
भास्वत्‌ - सूर्य / तेजस्वी.
मघवान्‌ - इंद्र.
लंघणे (उल्लंघणे) - ओलांडणे, पार करणे.
वामन - विष्णूचा पाचवा अवतार. याने बलिकडून त्रिपादभूमीचे दान घेतले.
सिंधु - समुद्र.
हनु - हनुवटी, हनवटी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण