A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
असे शांत होणे मला

असे शांत होणे मला पेलवेना
सुखाची अनोळखी चाहूल लागे
असे मोकळे श्वास होतात तेव्हा
ऊबेचा शहारा अलवार मागे..

हे माझेच आहे मला का कळेना
असुदे असुदे जरी वेगळेसे
सावलीत माझ्या कवडसे माझे
रुपेरी रुपेरी कधी सावलेसे
सावलीत माझ्या..

ॠतुंना कसे सांगू बहरू नका रे
मला पानझडही आता सोसवेना
नव्याने फुलावे हवे वाटते पण,
नको तो फुलांचा कहर सोसवेना
उजळून येती क्षणांचे निखारे
टपोरे टपोरे कधी बावरेसे
सावलीत माझ्या..