A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नाम आहे आदि अंती

नाम आहे आदि अंती नाम सर्व सार
आहे बुडत्याला नौका जीवनी आधार

नामे तरीले पतीत, तरीले पाषाण
नामे कोळीयासी दिधले मुनीपद जाण
नाम जाळी संचिताचा पूर्व बडिवार

नाममय झाला चोखा, ब्रह्मी लीन झाला
अजामेळ पापराशी वैकुंठासी गेला
तेथे उभे पंढरीचे घेउनी आकार

नाम जपो वाचा नित्य, श्वासांतही नाम
नाममय होवो देवा माझे नित्य कर्म
नामाच्याचसंगे लाभो प्रेम रे अपार
अजामेळ - ही कथा भागवत पुराणातली आहे. अजामेळ नावाचा एक पापी होऊन गेला. तो कधीच सत्कर्मात रमत नसे. पण त्याने त्याच्या मुलाचे नाव नारायण ठेवले होते. अंतसमयी मुलास हाक मारताना त्याच्याकडून हरीनामाचा जप झाला आणि उपरती होऊन त्यास सद्गती मिळाली.
बडिवार - प्रतिष्ठा / मोठेपणा.