A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अति गोड गोड ललकारी

अति गोड गोड ललकारी
सोड बुलबुला प्यारी तव न्यारी

कशि लोपत माया गिरिधारी
झुरते राधा मनात भारी
आतां घे धाव झणिं मुरारी
हा संदेश सांग सुखकारी
गीत - स. अ. शुक्ल
संगीत -
स्वर- जे. एल्‌. रानडे
राग - भीमपलास
गीत प्रकार - भावगीत
गिरगांव मुंबईतले सुप्रसिद्ध शीघ्रकवी श्री. सदाशिव अनंत (स. अ.) शुक्ल यांचं हे भावगीत १९३८ साली श्री. जनार्दन लक्ष्मण (जे.एल.) रानडे ह्यांनी हिज मास्टर्स व्हाईस (H.M.V) कंपनी करीता ध्वनिमुद्रित केलं. भीमपलास रागातल्या ह्या गाण्यानं लोकप्रियतेचे व खपाचे नवीन विक्रम केले. त्यांचं छायाचित्र कंपनीच्या माहिती पुस्तिकेवर छापण्यात आलं. श्री.रानडे ह्यांनी पुढे सांगलीत टुमदार बंगला बांधला व त्याचं नाव 'ललकारी' असं ठेवलं.

जे. एल. रानडे ह्यांचा जन्म २७ मार्च १९०५ चा - इचलकरंजीतला. संगीताचं बाळकडू आईकडून मिळालं. १९११ साली वडील वारले. तीन मुलांच्या शिक्षणासाठी आईनं सांगलीला घर केलं. सिटी हायस्कुलात संगीत शिक्षणाला अनुकूल वातावरण होतं. आधी मोरोबा गोंधळी व नंतर गोडबोले गुरुजींकडून त्यांनी संगीताचे धडे गिरवले. भातखंडे, रा. ब. देवल व सी. क्लेमंट्स ह्यांचे ग्रंथ त्यांना अभ्यासायला मिळाले. १९२१ साली आई वारली व शिक्षण सोडून नोकरी करणं भाग पडलं. अहमदनगरच्या डिस्ट्रिक्ट कोर्टात कारकुनाची नोकरी मिळाली ती त्यांनी १९२७ ते १९५९ इतक्या प्रदीर्घ काळ केली. त्यावेळी श्री. सी. क्लेमंट्स डिस्ट्रिक्ट जज्ज होते. कोर्टाच्या चेंबरमध्येच संगीत शिक्षण व चर्चा होत असत. त्या काळात नगरला संगीताचं असं काहीच वातावरण नव्हतं. त्यामुळे गवई, संगीत शिक्षक अशी कारकीर्द त्यांनी सुरु केली. १९३६ पर्यंत दर शनिवारी पुण्यात विनायकबुवा पटवर्धनांकडे गाणं शिकायला नगरहून जात.

त्या काळात आकाशवाणी व ग्रामोफोन रेकॉर्डस ह्या द्वारे कलाकार प्रसिद्ध होत. नवीन कलाकारांना प्रोत्साहन मिळत असे. रानडे ह्यांचा आवाज सुरेल, ताना दाणेदार. गाणं मोजकं, पण रंजकपणे मांडत असत. बालगंधर्व, गोविंदराव टेंबे ह्यांची शिफारसपत्रं घेऊन रानडे मुंबईला आले. रेडियोत दिनकर अमेंबल व बुखारींना तर ग्रामोफोन कंपनीत रमाकांत रुपजी व जी. एन्‌. जोशींना भेटले. परिणामी २४ डिसेंबर १९३३ रोजी त्यांचं रेडियोत पहिलं गाणं झालं तर जुलै १९३४ मध्ये पहिली ध्वनिमुद्रिका निघाली. पुढे १९५२ पर्यंत ते ह्या दोन्ही माध्यमांत रमले. त्यांनी ४० ध्वनिमुद्रिका म्हणजे ८० गाणी मुद्रित केली. दुर्देवाने त्यातलं एकही गाणं कंपनीनं पुन्हा एल.पी./ई.पी. वर वितरित केलं नाही. शास्त्रीय, सुगम शास्त्रीय, मराठी भावगीतांच्या वैविध्य व वैशिष्ट्यपूर्ण ध्वनिमुद्रिका त्यांनी दिलेल्या आहेत. त्यांची काही गाजलेली गाणी - 'अति गोड गोड ललकारी', 'कलिका गोड नाचे छुमछुम', 'गोड गोड मुरली सखेगे', 'फुलल्या कळ्या प्रेमाच्या', 'नभि हसली चन्द्रिका चकोरा', 'नवल ही बासरी', 'आज सखी श्यामसुंदर', 'राहा उभी तशीच ग', 'वैरिणही रजनी प्रियविण'. त्यांचे गीतकार होते - श्री. स. अ. शुक्ल, ग. दि. माडगुळकर, भा. वि. वरेरकर, रा. ना. पवार, मा. ग. पातकर, बाबूराव गोखले व पांडुरंग दिक्षित. ही सर्व गाणी ७८ आर.पी.एम. तबकडयांवर असून एक गाणं तीन/साडेतीन मिनिटं वाजतं.

त्यांचं व्यक्तिमत्त्व प्रांजळ व पारदर्शी होतं. प्रापंचिक जीवनही मोठं सुखाचं गेलं. १९६० च्या सुमारास रिटायर झाल्यावर वर्धा येथे 'महिलाश्रम' मध्ये त्यांनी कार्यालयीन काम व संगीताचं शिक्षण अशी दुहेरी जबाबदारी पत्करली. अखिल भारतीय गांधर्व विद्यालयाच्या वर्धा शाखेचं काम त्यांनी १९६१ ते १९९१ पर्यंत पाहिलं. संन्यस्त व अलिप्त वृत्ती असल्यानं व आपला उपसर्ग मुलाबाळांना होऊ नये म्हणून अखेरीस ते वृध्दाश्रमात जाउन राहिले. १९९७ साली वयाच्या ९२ व्या वर्षात ते हे जग सोडून गेले. ध्वनिमुद्रण तंत्रातील बदलांचे ते साक्षीदार होते. त्यांच्या सर्व ध्वनिमुद्रिका संग्राहकांकडे सुरक्षित असून त्यांचं पुन्हा वितरण होणं आवश्यक आहे.
(संपादित)

सुरेश चांदवणकर
सौजन्य- marathiworld.com
(Referenced page was accessed on 28 August 2016)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.