A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आत्ताच बया का बावरलं

हळद पिवळी पोर कवळी, जपुन लावा गाली
सावळ्याच्या चाहुलीनं पार ढवळी झाली
गजर झाला दारी, साजणाची स्वारी
साजणाची स्वारी आली, लाज गाली आली

जपुन होतं ठेवलं मन हे कधीच न्हाई झुरलं
उधळलं ग सम्दं बाई हातात न्हाई उरलं
जीव जडला पर न्हाई नजरंला कळलं
किती नडलं जिकिरीनं, मागं ना सरलं
आत्ताच बया का बावरलं
खरंच बया का घाबरलं

साद तू घातली, रानं पेटून आली
कावरीबावरी लाज दाटून आली
पाहिलं गुमान बाई, घेतलं दमानं बाई
चेतलं तुफान साजणा
बेभान झाले साजणा
नजरंला नजरंचं, नजरंनं कळलं
मन इवलं विरघळलं
अन्‌ नातं जुळलं
आताच बया का बावरलं
खरंच बया का घाबरलं

मन झालं धुंद बाजिंद, ललकारी ग
पिरतीचा गंध आनंद, नवलाई ग
लागली ओढ, मन हे लई द्वाड
सतवून झालं सम्दंच गोड
लागलं सजणीला सजणाचं याड

झालीया भूल ही उमजली या मनाला
परतुनी घाव हा लागला रं जीवाला
डोळं झाकलेलं बाई, रेघ आखलेलं बाई
मागं रोखल्यालं साजणा
उधळुनी गेलं साजणा
हरलंया पिरमाला, पिरमानं जिकलं
झगडुनी मन माझं अदबीनं झुकलं
साजणा तू सावरलं