जानकी जीवन विरहव्यथा
भंगिले शिवधनू करी, गौरतनु वरि जानकी रामा
हो चतुरगेहिनी रघुकुलकीर्ती ललामा
चंद्रास मिळे चांदणे उजळले गगन
की सुखद शरद चंद्रिका शोभवी भुवन
प्रिय तातवचन मानुनि जाशी काननी सुखे रघुराया
ये तुझ्या मागुनि तुझी जानकी छाया
जनलोक माउली रडे तात घननिळा
तुडवीत चालशी अश्रुफुलांच्या माळा
विनविती धरुनि वल्कले शरयु जललहरी
वनी नेऊ नको रे रामा, जनककुमारी
एकली पाहुनी नेई लंकापती
वनचरे तरुलता चळचळा कापती
रानीच्या पाखरा पुसती वेड्यापरी
रे सख्या सांग ना कुठे जनकसुंदरी
"सीते सीते विमलचरिते कोमले चारुशीले
का गे ऐसे कठीण मन तू प्रेमले आज केले"
जानकी जानकी राम ध्यानी मनी
शून्य दाही दिशा जानकीवाचुनी
फुटती गालांवरी आसवांचे मणी
विकल रव ऐकु ये राघवा त्यांतुनी
पाहिला का कुणा दीप ज्योतीविना
काय राहू शके राम सीतेविना
गीत | - | राजा बढे |
संगीत | - | शंकरराव व्यास |
स्वर | - | स्वर कोणाचा(चे) माहित असल्यास संपर्क करा. |
चित्रपट | - | रामराज्य |
गीत प्रकार | - | चित्रगीत, राम निरंजन |
कानन | - | अरण्य, जंगल. |
गेह | - | घर. |
चारू | - | सुंदर. |
परिसा | - | ऐकणे. |
रव | - | आवाज. |
ललाम | - | भूषण. |
वल्कल | - | वृक्षाच्या सालीचे केलेले वस्त्र. |
विकल | - | विव्हल. |
विमल | - | स्वच्छ / निर्मल / पवित्र / पांढरा / सुंदर. |
मराठी बोलपटांच्या इतिहासात ऑगस्ट १९४३ मध्ये सेन्सॉरसंमत झालेल्या 'प्रकाश पिक्चर्स'च्या विजय भट्ट निर्मित 'रामराज्य' या बोलपटाला खूपच आगळेवेगळे महत्त्व आहे. त्याआधीच्या वर्षी रजतपटावर आलेल्या प्रकाश पिक्चर्सच्याच 'भरतभेट' या बोलपटाने तशी उत्तम रसिकप्रियता मिळविली होती. पण 'रामराज्य'ने एक नवा इतिहास घडविला होता. आजही मराठीतील सर्व पौराणिक बोलपटांमध्ये परिपूर्ण निर्मितीच्या दृष्टीने 'रामराज्य'चा उल्लेख जाणकार रसिक 'तो अजरामर बोलपट होता', असाच करतात.
१९४२च्या फेब्रुवारी-मार्च महिन्याच्या सुमाराच्या दिवसांमध्ये, मुंबापुरीमध्ये ऑगस्टच्या क्रांतिदिनाची चाहूल लागत होती. या दिवसांमध्ये मराठी चित्रपटांच्या जडणघडणीत होणारा मोठा फरक जाणवू लागला होता. मुंबईच्या चित्रपटसृष्टीला महायुद्धाची झळ पोहोचलेली होती आणि युद्धजन्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी ब्रिटिश राज्यकर्त्यांनी चित्रपटनिर्मितीत परवाना पद्धत आणली होती. या बदलत्या परिस्थितीचा धांडोळा घेत रामायणातील कथाप्रसंग निवडतानाही आपल्या प्रेक्षकांना चित्रपटातील कथानकात नाट्यमयता आणणारा विष्णुपंत औंधकरासारखा समर्थ लेखक आणि संगीतकार शंकरराव व्यास या दोघांच्या आधीच्या 'भरतभेट'च्या यशाची आठवण ठेवून त्यांच्याबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या क्रांतिकारक, पण कविमनाच्या साहित्यिकाकडून गाणी घेण्याचा मनसुबा रचीत एके दिवशी विजय भट्ट हे सावरकरांच्या भेटीला गेले.
या काळात कविवर्य राजा बढे हे सावरकरांच्या सान्निध्यात वावरत होते. राजाभाऊंच्या कवितालेखनाची ताकद आणि करामत सावरकरांच्या चिरपरिचयाची होती. प्रसंगनिष्ठ कवितालेखन करण्यात राजाभाऊंची लेखणी एक नवा आविष्कार आणि नवा चमत्कार घडवून आणील, याची त्यांना मनोमन खात्री वाटत होती. तेव्हा विजय भट्टनी आपला चित्रपटगीत लेखनाचा प्रस्ताव सावरकरांकडे मांडताच भट्ट आपल्या बोलण्यात राष्ट्रप्रेमी कवी म्हणून वारंवार उल्लेख करीत आहेत, असे पाहून अधिक काही न बोलताच त्यांना सावरकर म्हणाले, "राजा बढे हा सुद्धा तुम्ही म्हणता तसा माझ्यासारखाच एक राष्ट्रप्रेमी कवी आहे. तो तुमच्या 'रामराज्य' बोलपटातील प्रसंगांना समर्पक गीते देऊन नक्कीच न्याय देईल."
या ठिकाणी आणखी एक वस्तुस्थिती वाचकांच्या माहितीसाठी देणे अप्रस्तुत ठरणार नाही. ते म्हणजे, इंग्रजीतील 'सिनेमा'ला मराठीतील बोलपट हा अन्वर्थक शब्द सर्वप्रथम सावरकरांनी दिला आहे.
महात्मा गांधी यांनी पाहिलेला एकमेव हिंदी बोलपट 'राम राज्य' हा होता. ('रामराज्य' हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषेत आला होता.)
(संपादित)
गंगाधर महाम्बरे
'कविश्रेष्ठ राजा बढे- व्यक्ती आणि वाङ्मय' या गंगाधर महाम्बरे लिखित पुस्तकातून.
सौजन्य- नंदिनी पब्लिशिंग हाऊस, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.