A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उठी उठी गोपाला

मलयगिरीचा चंदनगंधित धूप तुला दाविला
स्वीकारावी पूजा आतां उठी उठी गोपाला

पूर्व दिशेला गुलाल उधळून ज्ञानदीप लाविला
गोरस अर्पुनि अवघें गोधन गेलें यमुनेला
धूप-दीप-नैवेद्य असा हा सदुपचार चालला
स्वीकारावी पूजा आतां उठी उठी गोपाला

रांगोळ्यांनीं सडे सजविले रस्त्यारस्त्यांतुन
सान पाउलीं वाजती पैंजण छुन छुन छुनछुन
कुठें मंदिरीं ऐकूं येते टाळांची किणकिण
एकतानता कुठें लाविते एकतारिची धून
निसर्ग-मानव तुझ्या स्वागता असा सिद्ध जाहला
स्वीकारावी पूजा आतां उठी उठी गोपाला

राजद्वारीं झडे चौघडा शुभःकाल जाहला
सागरतीरीं ऋषिमुनींचा वेदघोष चालला
वन वेळूंचे वाजवी मुरली छान सूर लागला
तरुशिखरावर कोकिलकविनें पंचम स्वर लाविला
स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाला
उपचार - रीत, शिष्टाचार.
गोरस - दूध.
वेळू - बांबू.
सान - लहान.
जयदेवी जयति

रसिकहो !
कृष्ण सुदाम्याच्या परिचित कथेवर एक नाटक लिहावं असं ठरल्यानंतर कांहीं तरी वैशिष्ट्य शोधावं या हेतूनं अभ्यास केल्यानंतर पहिली गांठ घेतली पं. महादेवशास्त्री जोशी यांची ! त्यांच्या विद्वत्तेचा परिस स्पर्शून गेला म्हणून या नाटकाचं सोनं झालं, एरवीं माझ्या अकलेचं पितळ केव्हांच उघडं पडलं असतं !

तसं पाहिलं तर कृष्णानं सुदाम्याची नगरी सोन्याची केली हें एका ओळीचं कथानक साडेतीन-चार तास प्रेक्षकांना ऐकवणं- तेंहि आकर्षक रीत्या, वास्तविक अवघड ! जादू-ई-स्टंटसारखे ट्रिक सीनस् करून म्हणजे चमत्कार वगैरे दाखवून तें रंगवतां आलं असतं, पण मग त्याचं पुस्तक छापण्याची गरज नव्हती. पण चर्चा चालू असतांना विद्या आणि संपत्ति व सत्ता असा कांही संघर्ष नाटकांत मांडतां आला तर पहा ! असं एक वाक्य शास्त्रीबुवांच्या तोंडून बाहेर पडलं आणि मीं नकळत हात जोडले, ते मीं का जोडले हें शास्त्रीबुवांना कळलंहि नसेल, पण त्याचं कारण म्हणजे त्या क्षणीं सर सर सर सर सर्व नाटक माझ्या डोळ्यांसमोरून येऊन गेलं होतं- अगदी शेवटच्या पडद्यापर्यंत. सत्ता आणि संपत्ति यांचा समतोल राखण्यासाठीं विद्या जिवंत रहायला पाहिजे म्हणून श्रीकृष्णानं सुदाम्याची नगरी सुवर्णाची केली. ज्या क्षणीं द्वारका रसातळाला गेली ही कल्पना माझ्या मनांत चमकून गेली तो तो क्षण- मी हात जोडण्याचा !

जन्मभर अथांग साहित्यसमुद्रांत विचारमंथन करून काढलेलं नवनीत (लोणी) शास्त्रीबुवांनीं माझ्या हातीं दिलं आणि मग मीं तें 'कडसिलें विवेकें- फळ आलें परिपाके आमोदासी' या ज्ञानेश्वरीच्या वचनाप्रमाणे मीं तें लोणी विचाराच्या अग्‍नीवर कढवलं. आणि तें साजूक तूप नाटकाच्या रूपानं परमेश्वरी प्रतिमेनं माझ्या हातून प्रेक्षकांच्या पानावर वाढलं. त्यांत भर पडली 'हरीवरदा' या ग्रंथांतल्या सुदामचरित्राची !

दारिद्र्य आणि श्रीमंती हा संघर्ष जन्मभर जगांत चालूच असल्यामुळं राजकीय रूपक वगैरे जे का आतां लोक शोधत आहेत- या नाटकांतून त्याचं कारण तो शाश्वत संघर्ष ! रुक्मिणीचा त्याग व सत्यभामेचा लोभ- सुदाम्याची निरिच्छता व श्रीकृष्णाची निर्विकार न्यायप्रियता आणि नारदाचा कळलावेपणा एवढ्या गोष्टी हातीं आल्या- एवढी सामग्री नाटकाला- यशस्वी नाटकाला पुरेशी होती.

त्याग हा पृथ्वीवर राहतो आणि लोभ हा पुनर्जन्मासाठी परलोकीं जात असतो- असली कांही आशयपूर्ण वाक्यं माझ्या आकलनाबाहेरचीं असूनहि तीं माझ्या प्रतिभेनं मला पुरविलीं. कविता तर अक्षरश: पेन मधून उतरल्या. शाईनं लिहिल्या. माझ्या बुद्धीला व अनुभवाला त्या मोठेपणाला स्पर्श करण्याचा रतिमात्र अधिकार नाहीं. मी केवळ निमित्तमात्र, "प्रलयाचा विचार प्रत्येकजणच करतो पण पुनर्निर्माणाचा विचार फक्त भारतानंच केला होता ! हें पुनर्जन्मावर विश्वास न ठेवणार्‍या जगाला कळावं यासाठीं नारदा, तुझ्या कानीं घालतों आहें." हा भारतीय संस्कृतीचा अभिमान जो वाक्यांतून प्रगट झाला त्याचं कारण माझ्यावरचे हा संस्कार ! आता पुढं पुढं जाणार्‍यांना माझे विचार प्रतिगामी वाटले तर मीं काय करूं? पण जीवनचक्र सारखं फिरत असतं हें मानलं तर पुढें जाणं म्हणजे फिरून मूळ पदावर येणं- म्हणजे विवस्त्रावस्थेत फिरणं हें पुरोगामित्वाचं लक्षण हल्लीं हिप्पी संस्कृती पटवतेच आहे. तसा पुरोगामी मीं नाहीं झालों तरी चालेल, त्यापेक्षां संपूर्ण वस्त्रावस्थेतलं प्रतिगामित्व परवडलं.

पद्मश्री वसंत देसाई यांनी ज्या रसिकतेनं शब्दांना व प्रसंगांना स्वरांचा साज चढवला, त्याला तर उपमाच नाहीं. सर्वांच्या सामर्थ्यावर हे नाटक रंगभूमीवर आणलं. सर्व रसिकांच्या आशीर्वादानं उत्तम यशस्वीहि ठरलं, कांहीं वृत्तपत्रांतून आलेल्या परीक्षणांमुळं आम्ही क्षणकाल डगमगलों होतों, पण रसिकांनी सावरले आणि बरोबर भूमिका करणार्‍या कलावंतांना जें आवडतं तें नाटक चांगलं पाहिजे, हा मीं ठरवलेला सिद्धान्त पुन्हा एकदां खरा ठरला.

तसा मी थोडासा हळवा आहे. कधीहि प्रतारणा करायची नाही या निष्ठेने मी नाटकातलं प्रत्येक वाक्य लिहितों. असं असतानाही जेव्हां टाकाऊ ठरवलं जातं, कसंबसं उमे राहिलेलं दीनवाणं नाटक ठरतं, तेव्हां मी कुठंतरी मनांत जखमी होतों. हें सत्य आहे. माझा अनुभव असा आहे, कीं त्यामुळे बरोबरचे कलावंतहि व्यथित होतात. श्री. वसंतराव देसाई मला चरंवार सांगत, "बाळ ! तुम्ही का चिंता करता, प्रेक्षक काय बोलतात तें आम्ही ऐकतों. नाटक अप्रतिम आहे !" त्यांचं प्रेम मी जन्मांत विसरणार नाहीं. पण याचा अर्थ त्या टीकेमुळे ते दुःखी झाले नव्हते असं नव्हे !

आज प्रयोग पाहून सर्व सुखी होतांत याचं कारण माझे सहकारी कलावंत ! कुमार गंधर्वांनीं आत्मीयतेनें गाइलेली भूपाळी हें या नाटकाचं भूषणच ठरावं. त्यांचे आभार काय मानू? पुढील नाटकांत त्यांचा आवाज मागतों !

या विमनस्क अवस्थेंतल्या पहिल्या कांहीं प्रयोगांपैकी एका प्रयोगाला कु. भाषा काळे रुक्मिणीच्या वेशांत निररांजन घेऊन रंगभूमीवर आली. ज्योतींनीं तिच्या केसाला स्पर्श केला. एक छोटी ज्वाला उठली. पडदा टाकला. ती शुद्धीवर आली आणि पहिला आग्रह तिनं धरला नाटक पुढं सुरू करण्याचा ! पुन्हा पडदा उघडला. प्रेक्षक तसेच बसून होते. नाटक पूर्ण झालं. प्रेक्षकांनी सहानुभूतीची पावती दिली. या अग्‍निदिव्यांतून कलावंतांच्या तळमळीचं जे दर्शन घडलं त्या निष्ठेला अपयश स्पर्शहि करूं शकणार नाही.

असो; नाटक लिहिणं एकमेव व्यासंग असणार्‍या मीं त्या बाहेरचं असं कांहीं आज प्रथम लिहिलं, क्षमा करा !

पद्मभूषण ना. सी. फडके यांनी प्रयोग पाहून जें पत्र लिहिलं तें पुस्तकांत प्रसिद्ध करण्याचं मुख्य कारण त्या पत्रानंच आमचे उगमलेले पाय पुन्हा सरळ केले. त्यांचे आशीर्वाद सदैव हवेत.

सर्व रसिकांचे, सुहृदांचे आभार मानून पुन्हा एकदा पं. महादेवशास्त्री जोशी यांना मनांतून हात जोडतों, आशीर्वाद मागतों आणि थांबतों.
(संपादित)

बाळ कोल्हटकर
'देव दीनाघरीं धांवला' या नाटकाच्या पुस्तकाच्या प्रथमावृत्तीच्या प्रस्तावनेतून.
सौजन्य- केशव वामन जोशी (प्रकाशक)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

 

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.