A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बाळ तुझे नवसाचे- यशोदे

बाळ तुझे नवसाचे, यशोदे, बाळ तुझे नवसाचे
निळेसावळे रूप तयाचे, फूल जसे जवसाचे

लळा लागला मनोहराचा, विसर पडे मज संसाराचा
याच्यासंगे पळती पळासम प्रहर उभ्या दिवसाचे

दिवस संपला दीप लागले, घरा परतले गोप भागले
जिवावरी पण येते माझ्या गेही परतायाचे

यास संगती कशी मी नेऊ, घरात सासू-नणंद-जाऊ
सासुरवासी जिणे जाणिसी माझे वनवासाचे
गेह - घर.
भागणे - थकणे, दमणे.