A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
तुझाच गौतमा पडे प्रकाश

तुझाच, गौतमा, पडे प्रकाश अंतरी !
तुझेच धम्मचक्र हे फिरे जगावरी !

कळ्या कळ्या, फुले फुले तुला पुकारती
पहा तुझीच चालली नभात आरती
तुला दिशा निहाळती यशोधरेपरी !

तुझ्यामुळेच जाहला अखेर फैसला
दिलास धीर, तोडल्या अम्हीच शृंखला
अता भविष्य आमुचे असे तुझ्या करी !

तुलाच दुःख आमुचे, तथागता, कळे
तुझीच सांत्वना अम्हां क्षणोक्षणी मिळे
निनाद पंचशीलचा घुमे घरोघरी !

तुझ्यामुळेच मार्ग हा अम्हांस लाभला,
तुझ्यामुळेच सूर्यही पुन्हा प्रकाशला !
तुझेच सत्य यापुढे लढेल संगरी !

तुझ्यासमान एकही नसे तुझ्याविना
सदैव यापुढे करू तुझीच वंदना
झरेल अमृतापरी तुझीच वैखरी !

बुद्धं शरणं गच्छामि
धम्मं शरणं गच्छामि
संघं शरणं गच्छामि
तथागत - गौतम बुद्ध. (शाब्दिक अर्थ- हा शब्द पाली भाषेतील आहे ज्याचा अर्थ 'यथाचारी तथाभाषी'- म्हणजेच, ज्याप्रमाणे बोलतो त्याप्रमाणे कृती करतो.)
धम्म - 'धम्म' हा पाली भाषेतील शब्द, 'धर्म' या 'योग्य व न्याय्य मार्ग' या संस्कृत शब्दावरून आला आहे.
निहाळणे - बारकाईने पाहणे.
पंचशील - बुद्ध धर्मातील पंचशील- १. हिंसेपासून अलिप्‍त राहणे, २. चोरी करण्यापासून अलिप्‍त राहणे, ३. व्याभिचारापासून अलिप्‍त राहणे, ४. खोटे बोलण्यापासून अलिप्‍त राहणे, ५. मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्‍त राहणे.
वैखरी - वाणी, भाषा.
संगर - युद्ध.
संघ - बुद्धांच्या शिष्यांचा आध्यात्मिक समाज.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.