संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा
हा चंद्र ना स्वयंभू रवितेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा
प्रीतीस होय साक्षी हा दूत चांदण्यांचा
आभास सावली हा.. असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते असती नितांत भास
फसतात सावलीला हा दोष आंधळ्यांचा
या साजिर्या क्षणाला का आसवे दिठीत
मिटतील सर्व शंका उबदार या मिठीत
गवसेल सूर आपुल्या या धुंद जीवनाचा
गीत | - | सुधीर मोघे |
संगीत | - | पं. हृदयनाथ मंगेशकर |
स्वर | - | महेंद्र कपूर |
चित्रपट | - | हा खेळ सावल्यांचा |
गीत प्रकार | - | चित्रगीत |
दिठी | - | दृष्टी. |
दिग्दर्शक वसंतराव तथा अप्पा जोगळेकर त्यांच्या नव्या संकल्पित चित्रपटाचं कथासूत्र मला सांगत होते. अप्पा कथा फार सुंदर सांगायचे. अतिशय संयत शैलीत पण चित्रदर्शी शब्दांत. त्याचा पहिला अनुभव त्या संध्याकाळी मी घेतला. वरळी सी फेसवरचा, कोपर्यावरचा, पारशी बंगला- त्याचा वरचा मजला. एका प्रशस्त फ्लॅटमधला तसाच प्रशस्त दिवाणखाना. समोर पश्चिमेच्या बाजूची संपूर्ण भिंत व्यापणारी सिनेमास्कोप खिडकी. पलीकडे वरळीचा विस्तीर्ण समुद्र आणि त्याला टेकलेलं अस्तमान सूर्याचं बिंब; अशी ती संपूर्ण सायंकाळ माझ्या स्मरणावर कायमची उमटलेली आहे.
चित्रपटाचं शीर्षक ठरलं होतं, 'हा खेळ सावल्यांचा'. ह्या नावाचं शिरीष पैंचं एक नाटक येऊन गेल्याचं मला अंधुकपणे आठवत होतं. बहुधा अरुण सरनाईक आणि सतीश दुभाषी त्यात होते. अरुण सरनाईकांच्या त्या भूमिकेची विशेष तारीफही कानांवर होती. आज मात्र हे शीर्षक आमच्या चित्रपटाशीच जोडलं गेलं आहे. अर्थात त्या मूळ नाटकाचा ह्या शीर्षकाव्यतिरिक्त काहीही संबंध नाही.. तर पहिल्या श्रेयनामावलीसाठी एक शीर्षकगीत हवं होतं. श्रेयनामावलीच्या पाठीमागे सावल्यांचे खेळ दिसत राहावेत अशी अप्पांची कल्पना होती. कथाश्रवणाची ती बैठक संपवून मी खोलीवर रात्री बराच उशिरा परतलो तरी माझ्या मनात अप्पांचं ते पहिलं वाक्यंच रेंगाळत होतं- 'सूर्योदय होतो आणि सावल्यांचे खेळ सुरू होतात.' कारण त्या छोट्याश्या काव्यमय विधानाच्या पोटातच एक कविता दडली होती..
होते पहाट.. न्हाते सोन्यामध्ये सकाळ
छाया-प्रकाश ह्यांचा येतो जमून मेळ
डोळ्यांत रास रंगे रंगीन बहुल्यांचा
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा..
सकाळच्या कोवळ्या उन्हात, प्रवाहाच्या पाण्यात, आपली प्रतिबिंब निरखणारी झाडं.. हलक्या लाटांच्या मिठीत शिरणारं उबदार ऊन आणि मग तरंगातून डाव मांडणार्या सावल्या.. सावल्यांचं लडिवाळ बिलगून चालणं, त्यांचे भूल घालणारे चकवे आणि अभिसार.. कलत्या सांजवेळी त्यांचं लांबत लाणं; त्यांचा उदास आर्त-ओला स्वर आणि त्यात मिसळणारे विरही कळ्यांचे नि:श्वास.. गीताची पहिली तीन कडवी त्या एका वाक्यातूनच उलगडली गेली आणि शेवटच्या एका कडव्यात मूळ कथा-कल्पना सामावली गेली.
आभास सावली हा.. असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते असती नितांत भास
फसतात सावलीला हा दोष आंधळ्यांचा..
एकूण भट्टी बरी जमली होती. अप्पांना गाणं खूप आवडलं आणि माझ्या निवडीवर शिक्कामोर्तब झालं. चित्रपटाचे संगीतकार असणार होते, दत्ता डावजेकर..
तेवढ्यात तो चित्रपटच मुळात लांबणीवर पडला. लांबणीवर म्हणजे, भलताच लांबणीवर.. आणि नंतर एक वर्षाने तो पुन्हा सुरू झाला तेव्हा सगळंच चित्र पालटलं होतं. आणि त्या नव्या साजात पडद्यावर आल्यावरही; या गीताचा शीर्षकगीत म्हणून सामावेश होण्याचा योग नाही आला. 'संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा..' हा मुखडा कायम ठेवून आणि पुढचे अंतरे वेगळे लिहून प्रत्यक्ष नायकाच्या तोंडी ते आलं. आजही हे गाणं फारच लोकप्रिय आहे. मुळात ह्रुदयनाथ स्वत: हे गाणं फारच सुरेख म्हणायचे. 'कवी' म्हणून मात्र मी गाण्यापुरता स्वत:वरच नाखूष आहे. एक तर शालेय जीवनात गणिताच्या जोडीला माझी हमखास 'घसरगुंडी' आणि त्यामुळे घाबरगुंडीही करणार्या 'भूगोला'ची मला ह्या गाण्यात मनधरणी करावी लागली.. आणि
हा चंद्र ना स्वयंभू रवितेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा
ह्या ओळींमध्ये तीन विधानं आहेत. त्या विधानांचा कर्ता 'हा' म्हणजे 'चंद्र' असल्यामुळे तो तीनदा येण्यात वावगं काहीच नाही. पण तरीही ह्या गाण्यात हा 'हाहाकार' अंमळ जास्तच झाला आहे, असं मला वाटतं.
(संपादित)
सुधीर मोघे
गाणारी वाट
सौजन्य- मेनका प्रकाशन, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.