A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बाळ उतरे अंगणीं

बाळ उतरे अंगणीं :
आंबा ढाळतो सावली,
चिमुकल्या पायांखाली
सारी मख्मल सावळी.

बाळ उतरे अंगणीं :
खाली वाकली सायली,
हातीं बाळाच्या यावींत
फुलें-फुलांची डहाळी.

बाळ उतरे अंगणीं :
भान कशाचें ना त्याला,
उंचावून दोन्ही मुठी
कण्या शिंपतो चिऊला.

बाळ उतरे अंगणीं :
कसें कळालें चिऊला?
भराभरा उतरून
थवा पाखरांचा आला.

धिटुकल्या चिमण्यांची
बाळाभोवती खेळण
चिमुकल्या अंगणाची
बाळाभोवती राखण.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.