A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
भन्‍नाट रानवारा मस्तीत

भन्‍नाट रानवारा मस्तीत शीळ घाली
रानंच्या पाखरांची रानात भेट झाली

एकाच रानामंदी वाढलो एका ठायी
पुराण्या वळखीला ज्वानीची नवलाई
मनीची खूणगाठ लगीन गाठ झाली

रानाचा हिरवा शालू, आकाश नीळा शेला
हवेच्या कुपीमंदी मातीचा वास ओला
बाशिंग डहाळीचं, वेलींच्या मुंडावळी

पानांची गच्च जाळी, काळोख दाट झाला
काळोख गंधाळला, काळोख तेजाळला
झुलती काळोखात गाण्याच्या दोन ओळी
ठाय - स्थान, ठिकाण.
माझ्या चित्रपटगीत-लेखनातही काळोखाची गहिरी संगत सुटली नाही. रणजित देसाई यांच्या 'बारी' ह्या कादंबरीवर आधारित 'नागीण' या चित्रपटाकरीता दोनच कडव्यांचं एक गीत लिहिलं होतं.

भन्‍नाट रानवारा मस्तीत शीळ घाली
रानच्या पाखरांची रानांत भेट झाली..

संगीतकार भास्कर चंदावरकर त्याला चाल लावणार होते. पण प्रत्यक्षात काहीच घडलं नाही. पुढे स्वत:च संगीत दिलेल्या 'कशासाठी प्रेमासाठी' या चित्रपटात ते गाणं स्वरबद्ध करताना मी त्यामध्ये तिसरा अंतरा वाढवला. घनदाट रानातील रासवट शृंगार रंगवताना ही काळोखाची लिपीच कवीच्या मदतीला आली.

पानांची गच्च जाळी.. काळोख दाट झाला
काळोख गंधाळला.. काळोख तेजाळला
झुलती काळोखात गाण्याच्या दोन ओळी..

पण हे काळोख-भान नेहमीच रमणीय, सुखद नसतं. कधीकधी ते कडवट, जहरीही होऊन जातं.

प्रकाशाची वांझ तहान निमूट सोसणार्‍या आंधळ्या मनाला दिसतं, जाणवतं एकच.. अनादि भूतकाळापासून अगम्य भविष्यापर्यंत; सुस्‍त अजगरासारखा अद्धातद्धा पसरलेला हा विराट काळेखच खरा.. त्रिखंडातलं हलाहल गोठून बनलंय त्याचं मन.. आणि प्रलयातील उत्पाती ज्वालामुखींची झालीय त्याची मुर्दाड त्वचा.. एवढा तो सर्वशक्तिमान.. तो अनादी.. तो अनंत.
(संपादित)

सुधीर मोघे
सौजन्य- दै. लोकसत्ता (३ फेब्रुवारी, २०१३)
(Referenced page was accessed on 1 February 2017)

* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.

  इतर संदर्भ लेख

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  उत्तरा केळकर, सुरेश वाडकर