A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
भारताच्या सुपुत्रांनो

भारताच्या सुपुत्रांनो ! उठा घ्या राज्य हे हाता ।
भाग्य उदयास आलेले, बाणु द्या अंगिच्या रक्ता ॥

म्हणा- 'आजाद अम्हि झालो, न्याय देण्या नि घेण्याला ।
जीर्ण मानव्यता होती, तिला द्यायास उज्‍ज्‍वलता' ॥

नम्र व्हा सज्‍जना पायी, काळ व्हा गुंडशाहीचे ।
मजूर आणि शेतकरी यांना, सोपवा आपुली सत्ता ॥

चढू द्या शक्ती-शौर्याला, कुणी शत्रू नसो आता ।
बुद्धिच्या दैवि-दूतांनो ! वाढवा मित्रता-समता ॥

स्वराज्य लाभलेले हे, कळेना ज्या कुणा रंका ।
कळू द्या सौख्य देउनी, हर्षवा भारती जनता ॥

म्हणे तुकड्या सु-राज्याने, रमो सौंदर्य या लोकी ।
शिपाई व्हा तरुणांनो ! रक्षण्या देश मानवता ॥

 

Print option will come back soon
  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज