A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
भोगले जे दुःख त्याला

भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले!
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले!

ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे
पण दुज्यांच्या आसवांनी मज भिजावे लागले!

लोक भेटायास आले काढत्या पायांसवे
अन्‌ अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले!

गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी
मी कशी होते मलाही आठवावे लागले!

एकदा केव्हातरी मी वचन कवितेला दिले;
राखरांगोळीस माझ्या गुणगुणावे लागले!
गीत- सुरेश भट
संगीत - श्रीधर फडके
स्वराविष्कार - आशा भोसले
रवींद्र साठे
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
गीत प्रकार - कविता

 

  आशा भोसले
  रवींद्र साठे