तुझ्या कीर्तनाला देवा, धरती होई दंग
थरथरावा कधीही वादळाचा वेल
भक्तीभाव वार्यावरी मधुर झुलेल
तरंगतो अंतराळी भावपूर्ण ढंग
दीपराग गाऊनिया सदा चंद्र-सूर्य
सृष्टी-मैफिलीत खुलवी सुरम्य सौंदर्य
झळकती नादांतरी निखळ सप्तरंग
निशीदिनी नित्यनेमे चाले संकीर्तन
किरणांच्या आरतीने सतेज वंदन
मांगल्यात ऋतुऋतुंचे मोहरले अंग
गीत | - | गंगाधर महाम्बरे |
संगीत | - | मुकुंद गद्रे |
स्वर | - | उपेंद्र भट |
राग | - | भीमपलास, नटभैरव |
गीत प्रकार | - | भक्तीगीत |
संकीर्तन | - | स्तुती. |
केव्हातरी मला म्हणाले, " 'तुझे निळासावळा नाथ' हे गाणं जी. ए. कुलकर्णी गुणगुणायला लागलेत. 'कंठातच रुतल्या ताना'ने बाळ कुरतडकर मुंबई आकाशवाणीच्या कामगार सभेत रतीब घालतोय आणि 'तू विसरुनी जा' सारखी काहीशी स्टोरी माझ्याही आयुष्यात घडली, तेव्हा ते विसरणं मला शक्य नाही." सदानंद रेग्यांची ही बोलणी मोठी उत्साहवर्धक ठरत. हा माणूस आपल्याला सारखा भेटावा, बोलत रहावा असे वाटे.
अशाच त्या दिवसांमध्ये एकदा भर पावसात मुंबईच्या चर्चगेट स्टेशनवरून बाहेर पडताना आमची दोघांची दृष्टीभेट झाली. जुलै, ऑगस्टमधल्या त्या दिवशी पाऊस कोसळत होता. आम्ही दोघेही जाम भिजलो होतो. विजांचा कडकडाट चालू होता; तो ऐकून ते मला म्हणाले, "मित्रा, बघ हा बिजलीचा टाळ आणि नभाचा मृदंग आपल्याला सांगतोय, लेका ऑफिसला मार सुट्टी, दे बुट्टी ! तुझ्या गीतामध्ये दिसू दे ओतप्रोत भक्ती !! पाड, पाड, गाणं पाड. गाणं लिहिल्यावर सदानंद रेगेचीही आठवण काढ !!"
त्या दिवसाननंतर अनेक दिवस माझ्या मर्मबंधामध्ये रेग्यांनी मला दिलेला बिजलीचा टाळ आणि नभाच मृदंग मी सांभाळला. त्याकाळामध्ये मी मुंबईच्या लालबाग विभागामध्ये राहत होतो. संध्याकाळी निवासस्थानी परतताना चाळीचाळीतून प्रासादिक भजनी मंडळांचे टाळ कानांत घुमत आणि बिजलीच्या टाळाची आठवण येई. आणि एके दिवशी माझ्या ज्ञात अंगुलीने हे भक्तिगीत रंगरुपाला आणले- अगदी सहजगत्या.
बिजलीचा टाळ, नभाचा मृदंग
तुझ्या कीर्तनाला देवा धरती होई दंग ॥धृ॥
थरथरावा कधीही वादळाचा वेल
भक्तिभाव वार्यावरी मधुरा झुलेल
तरंगती अंतराळी भावपूर्ण ढंग ॥१॥
दीपराज गाऊनिया सदा चंद्रसूर्य
सृष्टीमैफलीत खुलवी सुरम्य सौंदर्य
झळकती नादांतरी निखळ सप्तरंग ॥२॥
निशिदिनी नित्यनेमे चाले संकीर्तन
किरणांच्या आरतीने सतेज वंदन
मांगल्यात ऋतुऋतुचे मोहरते अंग ॥३॥
हे भक्तिगीत लिहिताना माझ्या मनामध्ये देवापेक्षा सदानंद रेगेच अदृश्य रुपामध्ये अवतरलेले असावेत. कोणत्याही गीताला एकदा सुंदर मुखडा लाभला आणि त्यात अर्ध यश मिळाल्यासारखं असतं. ही मधुर प्रेरणाही त्याचीच. दीपराग गाऊनिया सदा चंद्र-सूर्य या ओळीतील 'सदा' हा शब्दप्रयोग मला वाटतं, त्यांच्या 'गाणं लिहिल्यावर सदानंद रेग्यांची आठवण काढ' या वचनावरुन सुचला असावा.
अनेक कवींनी आपल्या विशिष्ट कवितांच्या जन्मकथा प्रसिद्ध केलेल्या आहेत. प्रा. गो. म. कुलकणींसारख्या कविता रसग्रहणच्या क्षेत्रामध्ये नावाजलेल्या समीक्षकाने आपल्या 'रसग्रहण' या रसिकमान्य ग्रंथामध्ये म्हटले आहे की, '.. त्यावरून खुद्द कलावंताला स्वनिर्मितीचे रहस्य कसे आकलनदुर्लभ असते, याची कल्पना येईल. हा साराच प्रांत संदिग्ध, धूसर, प्रकट-अप्रकट मनाच्या आकाराभिमुख गुंतागुंतीने भरलेला आहे. नित्य वा नैमित्तिक, सामान्य वा विशेष जीवनानुभ चलित होऊन त्याचे नाद, रूप, रस, गंधात्मक रसायन केव्हा आणि कसे सिद्ध होईल, अवतरेल याचा नेमका अंदाज कोणालाच बांधता येत नाही. त्यात कविमनाच्या 'एरिआला' मध्ये योगायोगाने प्रविष्ट झालेलेही काही अनोखे संघातपूर्ण घटक असतात. त्यामुळे निर्मिती प्रक्रियेविषयी काही बोलणे, अतिशय वरवरचे फसवे ठरण्याचा संभव फार, तरीपण काव्याच्या आकलनाचे एक अंग, या नात्याने या प्रकारच्या निवेदनांचे महत्त्व असतेच.'
ही झाली 'बिजलीचा टाळ' या गीताची जन्मकथा. याची सांगितीक पूर्तता जून १९८९ च्या दर रविवारच्या पुणे आकाशवाणीवरील 'स्वरचित्र' या खास कार्यक्रमासाठी भीमसेन जोशी यांनी मुकुंद गद्रे यांच्या दिग्दर्शनाखाली म्हटलेल्या या भक्तीगीताच्या ध्वनीमुद्रणाने झालेली आहे, असे म्हणायला हरकत नाही.
(संपादित)
गंगाधर महाम्बरे
बिजलीचा टाळ
सौजन्य- नंदिनी पब्लिशिंग हाऊस, पुणे.
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.